नगर व पुणे जिल्हय़ातील शेतकऱ्यांना संजीवनी ठरणारी भीमा नदी आता मात्र वाळूतस्करांना वरदान ठरली आहे. दोन्ही जिल्हय़ांत फक्त श्रीगोंदे तालुक्यात (नगर) आर्वी, गार व अनगरे या तीन ठिकाणचे वाळूलिलाव झाले आहेत. मात्र या नदीपात्रातून याव्यतिरिक्त अनेक ठिकाणांहून वाळूचा बेकायदेशीर उपसा सुरू आहे. दररोज किमान ४० जेसीबी, पोकलेन व अन्य यंत्रसामग्रीच्या साहाय्याने राजरोसपणे ही लूट सुरू आहे. या वाळूतस्करांना दोन्ही जिल्हय़ांतील महसूल व पोलीस यंत्रणेचा आशीर्वाद असल्याचे बोलले जाते. तस्करीच्या मार्गाने हा वाळूउपसा असाच सुरू राहिला तर या नदीपात्राचे वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही.
भीमा नदी पुणे व नगर जिल्हय़ांतून वाहते. काठावरील दौंड (पुणे) व श्रीगोंदे, कर्जत (नगर) हे तालुके या वाळूतस्करांचे अड्डे बनले आहेत. दोन जिल्हय़ांतील तीन तालुक्यांचा समावेश असणाऱ्या या नदीपात्राचा वाळूतस्कर अतिशय चलाखीने वापर करतात. मध्यंतरी कर्जत तालुक्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी सिद्धटेकजवळ रात्री पाठलाग करून अनेक जेसीबी, पोकलेन, वाळूची वाहतूक करणारी वाहने पकडली होती. मात्र ही कारवाई जुजबी व केवळ दबाव टाकण्याएवढीच होती. कर्जत व दौंडच्या प्रांताधिकाऱ्यांनी सुरुवातीला वाळूतस्करांवर कारवाईचा धडाका दाखवला, मात्र आता महसूल विभागानेच हे रान मोकळे सोडले आहे.
या वाळूतस्करांची स्वतंत्र यंत्रणा आहे. त्यांचे ‘पंटर’ दौंड, कर्जत व श्रीगोंदे तहसील कार्यालयात दिवसभर असतात. ते तेथील दैनंदिन हालचालींची बारीकसारीक माहिती ठेवतात. हे नेटवर्क व्यवस्थित ‘सेट’ असल्याने वाळूतस्करांना येथील बित्तंबातमी सहजगत्या मिळते. प्रामुख्याने कारवाईची माहिती आधीच मिळत असल्याने त्यातून फारसे काही निष्पन्न होत नाही. धाडी टाकून या यंत्रणेच्या हाती काही लागतच नाही. सारे काही समजून, उमजून सुरू आहे. ही माहिती पुरवणारे स्थानिक अधिकारी व पोलीस या वेळी बरोबरच असतात. महसूल खात्यातील कामगार तलाठी दौंड, कर्जत व श्रीगोंदे तालुक्यातील भीमा व घोड नदीपात्राच्या गावांत नेमणूक मिळावी यासाठी लाखो रुपये खर्च करतात, अशीही माहिती मिळाली.
एकीकडे पर्यावरणाचा ऱ्हास, दुसरीकडे राज्य सरकारच्या महसुलावर पाणी आणि या बेकायदेशीर, परंतु मोठी आर्थिक आवक असलेल्या धंद्यातून मिळालेल्या पैशांतून परिसरात गुन्हेगारी वाढू लागली आहे. या पैशातूनच वाळूतस्करांनी दहशत निर्माण केली असून या दहशतीचा वापर आता अन्य धंद्यासाठीही होऊ लागला आहे. या दहशतीमुळेच नदीकाठच्या गावातून कोणी तक्रार करण्यासही पुढे येत नाही. ‘एकच वादा-दादा’, ‘नादच करायचा नाय’, अशी स्लोगन लिहिलेली त्यांची वाहने परिसरात दहशत पसरवण्याचाच उद्योग करतात. त्याकडेही संबंधित सर्वच यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष आहे.