कर्जत तालुक्यातील भीमा नदीपात्रात राजरोसपणे बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे. या वाळूतस्करांवर रविवारी रात्री सिद्धटेक येथे मोठी कारवाई करण्यात आली. पोलीस उपाधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नितीन साळुंके यांनी पथकासह साध्या वेशात जाऊन ही कारवाई केली. त्यात वाहनांसह आठ जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी दुपारी महसूल व पोलिसांच्या कर्जत व दौंड (पुणे) येथील पथकांनी पुन्हा संयुक्त कारवाई करून बेकायदेशीर उपसा करणा-या १५ बोटी जाळून टाकल्या.
रविवारी रात्री करण्यात आलेल्या कारवाईत हरिभाऊ कुंडलिक ठोंबळे, विष्णू सुभाष राऊत, शंकर साहेबराव टकले, विलास तानाजी चव्हाण, तुकाराम बापू लष्कर, सचिन शिवाजी बनकर, गोपाळ प्रसाद यादव, बापू कोंडिबा खामगळ या आठ जणांना अटक करण्यात आली. त्यांचा एक जेसीबी, पाच ट्रक व चार ब्रास वाळूही जप्त करण्यात आली.  
मंगळवारी पुन्हा दुस-या दिवशी कर्जतचे प्रांताधिकारी संदीप कोकडे, पोलीस उपाधीक्षक धीरज पाटील व दाैंडचे तहसीलदार शेळके यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करून नदीपात्रातील तब्बल १५ फायबर बोटी फोडून टाकल्या व नंतर पेटवून दिल्या. वाळूतस्करांचे त्यात सुमारे एक कोटीचे नुकसान झाले आहे. या कारवाईबद्दल पोलीस व महसूल विभागाचे कौतुक होत आहे.