शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकार आणि भाजपावर सडकून टीका केली. “बाबरी यांनी पाडली नाही, राम मंदिराचा निर्णय त्यांनी घेतला नाही. मात्र, राम मंदिराचा सोहळा १ जानेवारीला घेत आहेत,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच दोन नेत्यांचा उल्लेख करत राम मंदिराच्या कार्यक्रमावेळी दंगली पेटवल्या जातील, असा गंभीर आरोप केला. ते रविवारी (२७ ऑगस्ट) हिंगोलीत बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, “तमाम हिंदूंनी आणि देशातील सर्व लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. पाकिस्तानवरील हल्ला हे ढोंग होतं हे कळलं. सर्वात भयानक म्हणजे यांनी काहीही न करता राम मंदिर उभारलं जात आहे. कारण बाबरी यांनी पाडली नाही, राम मंदिराचा आदेश यांनी दिला नाही, तो न्यायालयाने दिला. पैसे लोकांनी दिले. आता आणखी काही पैसे सरकार देत आहे.”
“राम मंदिराच्या सोहळ्यावेळी दंगली पेटवल्या जातील”
“म्हणजे बाबरी यांनी पाडली नाही, राम मंदिराचा निर्णय त्यांनी घेतला नाही. मात्र, राम मंदिराचा सोहळा १ जानेवारीला घेत आहेत. त्यावेळी आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. सत्यपाल मलिक आणि मोहूआ मोईत्रा यांनी सांगितलं आहे की, राम मंदिराच्या सोहळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो हिंदुंना बोलावतील. बसेस बोलावतील, ट्रेन्स आणतील आणि सोहळ्यावरून परत जाताना मुस्लीम वस्तीत किंवा कुठेतरी त्या गाड्यांवर किंवा रेल्वेवर दगडफेक करून देशात दंगली पेटवल्या जातील”, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
व्हिडीओ पाहा :
हेही वाचा : “दाढीवाला, अमिबा, इंडियन मुजाहिद्दीन ते चांद्रयान”, उद्धव ठाकरेंनी मोदींवर नेमकी काय टीका केली? वाचा…
“…आणि पुन्हा एकदा धार्मिक वाद पेटवून हे सत्तेत येतील”
“हे त्या मलिक आणि मोईत्रा यांचं मत आहे, माझं नाही. पुन्हा आपलं तेच होणार, गोरगरिबांच्या घरांचा सत्यानाश, राखरांगोळी होईल आणि पुन्हा एकदा धार्मिक वाद पेटवून हे सत्तेत येतील. सबका साथ सबका विकास झाल्यावर सबको लाथ, दोस्तों का विकास होईल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत,” असंही उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.