मराठी भाषेच्या विकासासाठी तसेच सीमाभागातील मराठी बांधवांसाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत. बेळगावमध्ये चालवल्या जाणाऱ्या मराठी शाळा आणि मराठी वृत्तपत्रांना सरकार मोठा आर्थिक आधार देणार आहे.

उद्धव ठाकरे सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प शुक्रवारी जाहीर झाला. यामध्ये मराठी भाषेच्या विकासासाठी काही महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. त्यानुसार मराठी भाषेच्या प्रचार, प्रसार आणि संवर्धनासाठी मुंबईत ‘मराठी भाषा भवन’ उभारण्यात येणार आहे.

त्याचबरोबर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील बेळगाव येथे मराठी शाळांच्या संवर्धनासाठी सरकारने १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या भागात ज्या मराठी शैक्षणिक संस्था आहेत अशा संस्थांना याद्वारे मदत देण्यात येणार आहे.

दरम्यान, सीमावादाच्या कचाट्यात अडकलेल्या मराठी भाषिकांचा आवाज म्हणून काम करणाऱ्या मराठी वृत्तपत्रांसाठी देखील या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. या मराठी वृत्तपत्रांचा पर्यायाने मराठी भाषिकांचा आवाज बुलंद रहावा यासाठी राज्य शासन त्यांना सरकारी जाहिराती देणार आहे. यामुळे या वृत्तपत्रांचा आर्थिक पाठबळ मिळू शकेल.