विवाह सोहळ्यामध्ये पैशांची उधळपट्टी केल्याच्या कारणावरून माजी मंत्री भास्कर जाधव यांच्यासह विविध कारणांमुळे आरोप झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना शरद पवार यांनी खडसावल्यावर त्यांनी माफी मागण्याचे प्रकार थांबले आहेत असे वाटत असतानाच, नव्याने मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या मंत्र्यांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. जळगावच्या घरकुल घोटाळ्यात अडकल्यामुळे मंत्रीपद गमवावे लागलेले गुलाब देवकर यांच्या जागी राज्यमंत्री म्हणून स्थान मिळालेले भुसावळचे संजय सावकारे यांच्यावर कार्यकर्त्यांच्या ‘बिहारी स्टाइल’ वर्तनामुळे जनतेची माफी मागण्याची वेळ आली आहे.
राज्यमंत्री म्हणून सावकारे यांचा शपथविधी झाल्यानंतर गुरुवारी दुपारी गीतांजली एक्स्प्रेसने त्यांचे भुसावळ येथे आगमन झाले. रेल्वे स्थानकावर त्यांचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. ढोल-ताशांच्या दणदणाटात सावकारेंची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी चक्क नोटांची उधळण करण्यास सुरुवात केली. या नोटा गोळा करण्यासाठी गर्दी झाली. जणूकाही चेंगराचेंगरीचे स्वरूप प्राप्त झाले. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि खुद्द सावकारे यांच्यासमोर हा प्रकार सुरू असताना त्यांना तो थांबवावा असे अजिबात वाटले नाही.
या प्रकाराचा बोभाटा झाल्यावर हे प्रकरण अंगाशी येणार असल्याचे लक्षात घेत सावकारे यांनी झाल्या प्रकाराबद्दल महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली आहे. अतिउत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांकडून हा प्रकार घडला असावा असे सांगतानाच नोटा उधळणारे कार्यकर्ते कोण होते, हे आपणास माहीत नसल्याचा विश्वामित्री पवित्राही त्यांनी घेतला. सावकारे यांच्या मिरवणुकीतील या प्रकाराची आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कशी दखल घेतात, याची सर्वाना उत्सुकता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jun 2013 रोजी प्रकाशित
राष्ट्रवादी मंत्र्यांची ‘बिहारी स्टाइल’ मिरवणूक
विवाह सोहळ्यामध्ये पैशांची उधळपट्टी केल्याच्या कारणावरून माजी मंत्री भास्कर जाधव यांच्यासह विविध कारणांमुळे आरोप झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना शरद पवार यांनी खडसावल्यावर त्यांनी माफी मागण्याचे प्रकार थांबले आहेत असे वाटत असतानाच, नव्याने मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या मंत्र्यांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवली आहे.

First published on: 15-06-2013 at 01:22 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihari style procession of ncp minister