राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं असून शिवसेनेकडून भाजपावर सामना संपादकीयच्या माध्यमातून जोरदार टीका करण्यात आली आहे. संशयास्पद मृत्यूचा धड तपास होऊ न देता आदळआपट करणे हे लोकशाहीचे विकृत रूप आहे. एक ना अनेक प्रश्न राज्याला भेडसावत आहेत त्यावर बोलायचे नाही लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार असं शिवसेनेने म्हटलं आहे. दरम्यान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला उत्तर दिलं आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस सकाळी नागपुरात दाखल झाले. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “अधिवेशनात काहीच फलित नाही, सगळ्यात महत्वाचे की विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची निराशा झाली,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
यावेळी त्यांना सामना संपादकीयमधून करण्यात आलेल्या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “जनहिताचे मुद्दे उचलणं जशी आमची जबाबदारी आहे तशी वृत्तपत्रांचीदेखील आहे. आम्ही वीजेबद्दल, शेतकरी, कोविडबद्दल बोललो. पण त्यांना जनहिताचे मुद्दे दिसले नाहीत. त्यांना केवळ टोचणारे आणि बोचणारे मुद्दे दिसले. असा अग्रलेख आल्याने घाव वर्मी बसला आहे हे लक्षात आलं आहे”.
काय आहे संपादकीयमध्ये – “संशयास्पद मृत्यूचा धड तपास होऊ न देता आदळआपट करणे हे लोकशाहीचे विकृत रूप”
“करोना वाढत असून सरकारचं त्याकडे लक्ष नाही, त्यासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नाही. करोना अधिवेशन असतं त्याच्या आधी वाढतो, सुरु असताना कमी होतो आणि संपल्यानंतर पुन्हा वाढतो. सरकारला फक्त अधिवेशन टाळण्यासाठी करोना दिसतो. इतर वेळी दिसत नाही. परिस्थिती भयावह आहे त्यासाठी प्रभावी योजना राबवताना दिसत नाही,” असं फडणवीस म्हणाले आहेत. “हे सरकार शेतकरीविरोधी आहे, गरीबविरोधी आहे हे स्पष्ट झालं आहे,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.
दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात तीन महिन्यात भाजपाचं सरकार येईल असा दावा केला असून त्यासंबंधी विचारण्यात आलं असताना फडणवीसांनी बोलण्यास नकार दिला आणि त्याबद्दल सुधीरभाऊच सांगू शकतील असं सांगितलं.