सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या संचालक मंडळाविरूध्द बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. बनावट कागदपत्रे दाखल करून शासकीय निधी घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकमंगल मल्टिस्टेट सोसायटीच्या अध्यक्षपदी सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख आहेत. त्यामुळे या प्रकरणाने सुभाष देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी पांडुरंग येडगे यांनी सोलापूरमधील सदर बाझार पोलिसांकडे तक्रार दिली आहे. यात म्हटले आहे की, जून २०१५ मध्ये लोकमंगल मल्टीस्टेट सोसायटीच्या रोहन सुभाष देशमुख, रामराजे राजेसाहेब पाटील, अविनाश महागावकर, प्रकाश लातुरे, सचिन कल्याणशेट्टी, बशीर शेख, मुरारी शिंदे, हरिभाऊ चौगुले, भिमाशंकर नरसगोंडे या तत्कालीन संचालक मंडळाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी अर्ज केला होता. दुग्धशाळा विस्तारीकरण आणि दुध भुकटी प्रकल्प उभारणीसाठी हा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यांना एकूण २४ कोटी ८१ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले होते. एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम पहिल्या टप्प्यात मंजूर झाली. यातील पाच कोटी रुपयांचे अनुदान जिल्हा दुग्ध विकास अधिकारी यांच्या बँक खात्यात जमा झाले. मात्र, दरम्यानच्या काळात या प्रकरणात दाखल झालेल्या तक्रार अर्जांची चौकशी करण्यात आली आणि शेवटी अनुदान रद्द करण्यात आले.

सरकारची फसवणूक करण्याच्या उद्देशाने लोकमंगलच्या संचालक मंडळाने विद्यूत मंडळाचे प्रमाणपत्र, प्रदुषण मंडळाचे प्रमाणपत्र, अन्न व औषध विभागाचे प्रमाणपत्र अशी विविध बनावट कागदपत्रे सादर केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आरोपींनी सरकारची १२ कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा आता पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

यापूर्वी सुभाष देशमुख अनधिकृत बंगल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यापाठोपाठ आता सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित ‘लोकमंगल’च्या संचालक मंडळविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने सहकारमंत्र्यांच्या अडचणीत भर पडली आहे.