“उद्धव ठाकरे मला म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक मला त्रास द्यायला लागले तर…!” रावसाहेब दानवेंची सूचक प्रतिक्रिया!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानावर भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

raosaheb danve on cm uddhav thackeray statement
मुख्यमंत्र्यांच्या विधानावर रावसाहेब दानवेंची सूचक प्रतिक्रिया!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्हा परिषद इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी केलेल्या विधानावरून राजकीय तर्क-वितर्क सुरू झालेले असताना आता त्याच व्यासपीठावर उपस्थित असलेल्या रावसाहेब दानवे यांनी त्यावर सूचक प्रतिक्रिया देऊन त्या चर्चेत अजूनच खतपाणी घातलं आहे. “व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माझी आणि एकत्र आले तर भावी सहकारी”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाषण करताना व्यासपीठावर पाहिलं, तेव्हा तिथे केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि रावसाहेब दानवे हे देखील होते. त्यावर आता रावसाहेब दानवेंनी सूचक प्रतिक्रिया देऊन नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे. एबीपी माझाशी बोलताना रावसाहेब दानवेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

“मुख्यमंत्री तिकडच्या अनुभवावर बोलत असतील!”

रावसाहेब दानवे यांनी आज बोलताना भाजपा शिवसेनेसोबत एकत्र यायला केव्हाही तयार असल्याचं सांगितलं. “शिवसेना-भाजपा हे समविचारी पक्ष आहेत. प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरेंनी ही युती घडवून आणली आणि गेली २५-३० वर्ष आम्ही एकत्र काम केलं. राजकारणात काहीही घडू शकतं अशी एक घटना राज्यात घडली आणि शिवसेनेने राष्ट्रवादी-काँग्रेससोबत घरोबा केला. कदाचित मुख्यमंत्र्यांना जो अनुभव आला असेल, त्याच्या आधारावर ते बोलले असतील की रावसाहेब भविष्यात आपण एकत्र येऊ शकतो. भाजपाची हीच भूमिका आहे की आम्ही समविचारी पक्ष आहोत. समविचारी पक्ष एकत्र येऊ शकतात. शिवसेनेच्या बाजूचा अनुभव लक्षात घेता त्यांची आमच्यासोबत येण्याची इच्छा असेल, तर भाजपा कधीही या विचाराशी सहमतच राहणार आहे”, असं ते म्हणाले.

“संसारात काहीतरी घडल्याशिवाय असे बोल माणूस बोलत नसतो. मुख्यमंत्र्यांना आमचाही अनुभव आहे आणि त्यांचाही अनुभव आहे. आम्ही याच भावनेचे आहोत की जरी शिवसेनेने आम्हाला सोडून तिकडे घरोबा केला असेल, तर राज्यातल्या दोन्हीही मतदारांना त्यांचं तिकडे जाणं पसंत पडलेलं नाही, अजूनही मतदारांना असं वाटतंय की त्यांनी इकडे यावं. जे मतदारांचं मत आहे, तेच आमचं मत आहे”, असं देखील दानवेंनी नमूद केलं.

आजी, माजी आणि भावी…! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानावरून तर्क-वितर्कांना उधाण!

“थोरातांसमोर मुख्यमंत्री मला म्हणाले…”

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यासमोर आपल्याला परत एकत्र येण्याविषयी सांगितल्याचं दानवे म्हणाले. “याचा अर्थ असा असेल, की तिथे फार काही आलबेल चाललेलं नाही. मला मुख्यमंत्री म्हणाले की काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक जर मला त्रास द्यायला लागले, तर मी भाजपाला बोलवून घेतो. हे मला उद्धव ठाकरे आज म्हणाले. या एकदा, आपण बसून बोलू. बाळासाहेब थोरातांच्या समोर ते म्हणाले की काँग्रेसवाले जर त्रास द्यायला लागले, तर मी तुमच्यासारख्यांना बोलवेन. ते कधी मैत्रीत बोलतात, कधी भाषणात या गोष्टी चालत असतात”, असं दानवे यांनी सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp raosaheb danve on cm uddhav thackeray statement in aurangabad reunion with shivsena pmw