पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून सर्वच पक्षांमध्ये राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. आघाडी आणि महायुतीचे नेते जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चेत गुंतले आहेत. निवडून येण्याची हमखास क्षमता असलेल्या संभाव्य उमेदवारांच्या नावाची चाचपणी सुरू असतानाच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी भाजपने आग्रही भूमिका घेतली आहे. या बदल्यात मुंबई-भिवंडीची जागा शिवसेनेला देण्यात येणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
दरम्यान, गुहागर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना आणि भाजपने एकाच वेळी दावा केल्याने महायुतीमध्ये पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी गुहागरची जागा शिवसेनेला मिळावी व तेथून रामदास कदम यांना उमेदवारी मिळावी, यासाठी आपण ‘मातोश्री’वर प्रयत्न करणार असल्याचे एका कार्यक्रमात बोलताना सांगितले, तर गुहागरची जागा आमचीच असल्याचा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर यांनी गुहागर दौऱ्यात केला आहे. शिवसेना व भाजपकडून होत असलेल्या या दाव्या-प्रतिदाव्यामुळे महायुतीत खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा पूर्वीपासूनच शिवसेनेच्या वाटेला आलेली आहे. सेनेचे वामनराव महाडिक यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. मात्र त्या वेळी त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर सुरेश प्रभू यांनी मात्र या मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून येण्याचा विक्रम केला होता; परंतु २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार डॉ. नीलेश राणे यांच्याकडून प्रभू यांना पराभव पत्करावा लागला होता. गेल्या चार-साडेचार वर्षांत खासदार डॉ. राणे यांनी या मतदारसंघावर आपले पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यामुळे राणे यांच्यासमोर कोणता उमेदवार द्यायचा याबाबत महायुतीमध्ये आणि विशेषत: शिवसेनेत चाचपणी सुरू असून राजापूरचे आमदार राजन साळवी, शिवसेना सचिव आ. विनायक राऊत आणि सुरेश प्रभू यांची नावे चर्चेत होती.
दरम्यान, या जागेसाठी भाजपने आग्रही भूमिका घेतल्याचे विश्वसनीय वृत्त असून तसा प्रस्ताव भाजपने शिवसेनेसमोर ठेवला आहे; परंतु शिवसेनेकडून या प्रस्तावाला प्रतिसाद न मिळाल्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. जर ही जागा भाजपला सोडण्यात आली, तर सिंधुदुर्गातील आमदार प्रमोद जठार यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या बदल्यात शिवसेनेला भिवंडी-मुंबईची जागा मिळण्याची शक्यता आहे, कारण त्या भागात शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व असून या वेळी आरपीआय महायुतीसोबत असल्याने त्याचा फायदा सेना उमेदवारालाच मिळेल, तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात आमदार प्रमोद जठार यांच्यासारखा तरुण, अभ्यासू आणि आक्रमक उमेदवार काँग्रेसचे खासदार डॉ. नीलेश राणे यांच्यासमोर उतरवून तोडीस तोड आव्हान उभे करण्याची भाजपची रणनीती असल्याचे दिसून येते.
गुहागरसाठी शिवसेना व भाजपमध्ये कलगीतुरा
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसाठी आग्रही भूमिका घेणाऱ्या भाजपने आता गुहागर विधानसभेची जागा पुन्हा पक्षाला मिळावी, अशी मागणी रेटून धरली आहे, तर या जागेसाठी शिवसेनाही प्रयत्नशील आहे. गत सप्ताहात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी एका कार्यक्रमात बोलताना या मतदारसंघातून रामदास कदम यांना उमेदवारी मिळावी म्हणून मी व माझे सर्व सहकारी शिवसैनिक मातोश्रीवर निकराचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर यांनी गुहागर दौऱ्यात बोलताना हा आमचाच मतदारसंघ असून तो या वेळी आम्ही पुन्हा मिळविणारच, असा निर्धार व्यक्त केल्याने या जागेवरून सेना व भाजप यांच्यात कलगीतुरा रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गुहागर हा गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचाच बालेकिल्ला राहिलेला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते कै. डॉ. तात्यासाहेब नातू व त्यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र डॉ. विनय नातू या मतदारसंघातून निवडून आले आहेत; परंतु २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत रामदास कदम यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी हा मतदारसंघ शिवसेनेने मागून घेतला. यामुळे नाराज झालेल्या डॉ. विनय नातू व त्यांच्या समर्थकांनी बंडाचे निशाण फडकावले. त्या वेळी झालेल्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर जाधव हे निवडून आले. भाजपचे बंडखोर डॉ. नातू यांना दुसऱ्या, तर शिवसेनेचे रामदास कदम यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. अद्याप जागावाटपाबाबत कोणताही निर्णय झालेला नसला तरी गुहागरची जागा भाजपला परत मिळावी, अशी कार्यकर्त्यांकडून मागणी होत आहे.