scorecardresearch

“जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या प्रतिमेवर चिखलफेक करायचे भाजपाचे षडयंत्र” काँग्रेस नेते सचिन सावंतांचा गंभीर आरोप!

“जनतेने डोळे उघडले नाहीत तर मनुवादाच्या जोखडात कायम जखडून घ्यावे लागेल”, असंही म्हणाले आहेत.

congress sachin sawant on devendra fadnavis
(फोटो-लोकसत्ता ग्राफीक्स टीम)

मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराजांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका सुरू आहे. याशिवाय राजकीय वर्तुळातूनही यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, आमदार अमोल मिटकरी आणि भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी या वक्तव्याचा निषेध नोंदवल्यानंतर आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी बागेश्वर बाबांच्या या वक्तव्यावरून भाजपावर टीका केली आहे.

“जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या प्रतिमेवर चिखलफेक करायचे भाजपा व भाजपाप्रणीत भोंदूंचे षडयंत्र आहे. सुधारणावादी विचारांना संपवून मनुवाद पुनर्स्थापित करण्यासाठी सुधारणावादी महापुरुषांचे प्रतिमाभंजन करायचा डाव आहे. जनतेने डोळे उघडले नाहीत तर मनुवादाच्या जोखडात कायम जखडून घ्यावे लागेल.” असं सचिन सावंत म्हणाले आहेत.

हेही वाचा – “बागेश्वर बाबाने तुकोबारांयांबद्दल गरळ ओकली असताना राज्याचं पालकत्व ज्यांच्याकडं आहे ते…” रोहित पवारांनी व्यक्त केला संताप!

धीरेंद्र कृष्ण महाराजांचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते संत तुकाराम महाराज यांच्याविषयी बोलताना दिसत आहेत. संत तुकाराम महाराज यांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची, असा दावा धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी केला आहे.

हेही वाचा – धीरेंद्र शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी, म्हणाला “मी अमर सिंह बोलतोय, धीरेंद्र शास्त्रीच्या…”

बागेश्वर बाबा नेमकं काय म्हणाले? –

“संत तुकाराम महाराष्ट्राचे एक असे महात्मा ज्यांची पत्नी त्यांना रोज काठीने मारत होती. कुणीतरी त्यांना विचारलं की तुम्ही पत्नीकडून मार खातात, तुम्हाला लाज वाटत नाही का? यावर संत तुकाराम म्हणाले की देवाची कृपा आहे की मला मारणारी पत्नी मिळाली. यावर त्या व्यक्तीने विचारले की यामध्ये देवाची कृपा काय? तर संत तुकाराम म्हणाले, जर प्रेम करणारी पत्नी मिळाली असती, तर मी देवावर प्रेम केलं नसतं, पत्नीच्याच नादात अडकलो असतो. मारणारी पत्नी मिळाली तर ती संधी तरी देतेय की, माझ्या नादात कुठे अडकलास जा प्रभू रामाच्या चरणी जा.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 13:59 IST