वाडा तालुक्यातील वसुरी येथे सोलोमेटल या फर्निश कंपनीमध्ये सोमवारी दुपारी अडीच वाजता स्फोट होऊन सात कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सरकारी तसेच खासगी रुग्णालयात उपचार सूरू आहेत. या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिपीन सिंग, गुम्ड्डू, कमलेश, बलराज, सहदेव पाल, पप्पू, मोनू सोनी,  अशी जखमींची नावे असून हे सर्व कामगार सोलोमेटल कंपनीत काम करतात. अपघातामध्ये मोनू हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ठाणे जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उर्वरित सहा जणांवर कुडूस येथील खासगी रुग्णालयात उपचार सूरू आहेत. सोलोमेटल या कंपनीत भंगार वितळवून लोखंडी रॉड बनविले जातात. या भंगारात युद्धामध्ये निकामी झालेल्या लोखंडी वस्तुंचा समावेश असतो. त्यामुळे या फर्निश कंपनीत नेहमीच स्फोट होत असतात. तर सोमवारी झालेला स्फोट हा सर्वात मोठा होता. वसुरी गावाजवळ असलेल्या या कंपनीमुळे स्थानिक ग्रामस्थांना खूपच त्रास होतो. ही कंपनी बंद करण्याची मागणी वसुरीचे माजी सरपंच गोपाळ पाटील यांनी जिल्हा प्रशासनाकडे वारंवार केली आहे. मात्र, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.