उत्तर प्रदेशातील इटावा येथे आयोजित राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत नाशिकची धावपटू ‘गोल्डन गर्ल’ अंजना ठमकेने आपला लौकिक कायम राखत स्पर्धा विक्रमासह तीन सुवर्णपदकांची कमाई केली असून नाशिकच्या इतर खेळाडूंनीही सुरेख कामगिरी केली आहे. उत्कृष्ट कामगिरीसाठी अंजनाला नॅनो कार बक्षीस म्हणून देण्यात आल्याची माहिती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी दिली.
नाशिकची गोल्डन गर्ल म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात अंजना यशस्वी झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर डंका गाजत असतानाच अंजनाने पुन्हा एकदा आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती केली असून इटावा येथे नुकत्याच संपलेल्या शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ४००, ८०० आणि १५०० मीटर अशा तीन स्पर्धामध्ये सुवर्ण मिळविले. विशेष म्हणजे ही कामगिरी करताना अंजनाने स्पर्धा विक्रमाची नोंद केली आहे. याशिवाय नाशिकच्या दुर्गा देवरेने एक सुवर्ण व एक रौप्य, संजीवनी जाधवने एक रौप्य, शशीने एक रौप्य तर किसन तडवीने एक कांस्यपदक मिळविले आहे. हे सर्व खेळाडू भोसला विद्यालयाच्या मैदानावर साईचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.
भोसला व्यवस्थापनाचे सहकार्य आणि महिंद्रा कंपनीकडून मिळणारे आर्थिक पाठबळ यांच्या जोरावर खेळाडूंची कामगिरी उंचावत असल्याची प्रतिक्रिया प्रशिक्षक सिंग यांनी व्यक्त केली आहे.