प्रवरेच्या कालव्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मंगळवारी दोन छोटय़ा मुलांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरातच खळबळ उडाली आहे. दोन्ही मुले दहा वर्षे वयाची असून त्यांची ओळख अद्यापि पटलेली नाही.
भंडारदरा धरणातून प्रवरा कालव्याला सध्या शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुरू आहे. राहाता तालुक्यातील राजुरी शिवारात प्रवरा डाव्या कालव्यामध्ये सोमवारी सकाळी दहा वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. त्याची ओळख पटवेपर्यंत दुपारी आणखी एका दहा वर्षांच्या मुलाचा मृतदेह बाभळेश्वर शिवारात आढळून आला. या दोन मुलांच्या मृतदेहामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. मात्र पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार पोहताना ही मुले कालव्यात बुडाली असावी. शिवाय दोघांचे मृतदेह दूर अंतरावरून वाहात आले असावे असाही अंदाज व्यक्त करण्यात आला.  
दोन्ही मुलांच्या मृतदेहाची सायंकाळी उशिरापर्यंत ओळख पटलेली नव्हती. राजुरी शिवारात सापडलेल्या मुलाच्या अंगात चॉकलेटी रंगाची अंडरवेअर व गळ्यात लाल रंगाचा दोरा असून सदर मुलाचा मृतदेह लोणी पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात ठेवला आहे. राजुरी पोलीस पाटील रावसाहेब गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूचे गुन्हे दाखल केले आहेत.