अलीकडील काळात शाळकरी मुलांचे वाढदिवस घरी आणि शाळांमध्येही धूमधडाक्यात साजरे केले जातात. पण या दिवशी खाऊ किंवा अन्य वस्तूंपेक्षा आम्हाला वाचनीय पुस्तके भेट म्हणून द्या, अशी मागणी येथील शाळकरी मुलांनी केली आहे.
निमित्त होते ‘रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सव २०१२’ मध्ये आयोजित ‘बालसभे’चे! मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्याच्या हेतूने आयोजित या अभिनव कार्यक्रमामध्ये येथील निरनिराळ्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना सूचना आणि अपेक्षा मांडण्याची संधी देण्यात आली. या प्रसंगी अतिशय मुद्देसूद बोलताना, पालकांनी आम्हाला ग्रंथप्रदर्शनाला घेऊन जावे, आवडीच्या पुस्तकांबाबत आमच्याशी चर्चा करावी, वाचनालयात इंटरनेट सुविधा आणि खाद्यपदार्थाचा स्टॉलही असावा, परिकथांपेक्षा विज्ञान-तंत्रज्ञानाची सोप्या भाषेत माहिती देणारी पुस्तके कमी किमतीत उपलब्ध करून द्यावीत अशा सूचना केल्या. त्यांचे संकलन करून या मागण्यांचा प्रस्ताव ‘बालसभे’ने एकमुखाने मंजूर केला आणि पुढील कार्यवाहीसाठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मदन हजेरी यांना सादर केला.
उत्कृष्ट नियोजन करण्यात आलेल्या या बालसभेत व्यासपीठावर प्रत्येक सहभागी शाळेचे प्रतिनिधी होते. सर्वश्री निखिल गुरव, उन्नती वैद्य, कल्याणी सुर्वे, तैयबा बोरकर, समिधा पाटकर, योगेश रावण, संयुक्ता लोकरे, मुस्कान कासू, ध्वनी गांधी आणि ऋचा हर्डीकर यांचा त्यामध्ये समावेश होता. सौरभ लेले आणि अनिकेत चांदोरकर यांनी नेटके सूत्रसंचालन केले.
सभेसाठी उपस्थित विद्यार्थ्यांपैकी तुबा काद्री, सौम्या पै, पार्थ बापट, प्रणव दामले, रोहित महाबळ, स्वरूप देऊळकर, उदय माळकर, हेमंत पुनसकर, काझी अंबरिन, रब्बाना सोलकर, अर्चना परीट, कस्तुरी भागवत, सजिद खान, शिवानी सावंत, दुर्गा साखळकर, अदिती परब, श्लोका बारटक्के, साबा भंडारी, कपिल लिमये, गौरी ढोले, शुभा जाधव, भावना ठीक इत्यादी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सूचना मांडल्या.
राज्यात प्रत्येक जिल्ह्य़ामध्ये ‘ग्रंथोत्सव’ आयोजित करण्यात येत असले तरी या उपक्रमाचे वेगळेपण लक्षात घेऊन राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी सभेत संमत झालेला प्रस्ताव आवर्जून मागवून घेतला आहे. दरम्यान तीन दिवस चाललेल्या या ग्रंथोत्सवाचा समारोप कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष महेश केळुसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत काल संध्याकाळी झाला. येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष देव अध्यक्षस्थानी होते.
त्यापूर्वी झालेल्या ‘मराठी भाषेचा विकास’ या विषयावरील परिसंवादात प्रा. गौतम ब्रrो, सुहास विध्वांस, अॅड. दीपक पटवर्धन, सिद्धी महाजन यांनी भाग घेतला. प्रा. श्रीकृष्ण जोशी यांनी बीजभाषण सादर केले, तर मदन हजेरी यांनी अध्यक्षीय समारोप केला. जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांनी सूत्रसंचालन केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या सहकार्याने जिल्हा माहिती कार्यालय, शासकीय विभागीय ग्रंथालय आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे संयुक्तपणे हा महोत्सव साजरा करण्यात आला. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवाच्या काळात ग्रंथप्रदर्शन आणि सवलतीच्या दराने ग्रंथविक्रीही आयोजित करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 19th Feb 2013 रोजी प्रकाशित
शाळकरी मुलांना वाढदिवशी हवी पुस्तकांची भेट
अलीकडील काळात शाळकरी मुलांचे वाढदिवस घरी आणि शाळांमध्येही धूमधडाक्यात साजरे केले जातात. पण या दिवशी खाऊ किंवा अन्य वस्तूंपेक्षा आम्हाला वाचनीय पुस्तके भेट म्हणून द्या, अशी मागणी येथील शाळकरी मुलांनी केली आहे.
First published on: 19-02-2013 at 05:06 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book gift to student on occasion of student birthday