महामार्ग पोलीस घेणार कारणांचा शोध
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटून ते वाहन रस्तादुभाजकाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन अपघात होण्याचे प्रमाण या वर्षी लक्षणीय वाढले आहे. या वर्षी अशा प्रकारचे एकूण ३३ अपघात घडले असून, त्यात २१ जणांना प्राण गमवावा लागला, तर ६० जण जखमी झाले आहेत. या वर्षी अशा अपघातांचे प्रमाण का वाढले आहे, याचा शोध घेण्यासाठी आता राज्य महामार्ग पोलीस पुढे सरसावले आहेत.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर रविवारी मध्यरात्री झालेला अपघात विचित्र होता. एका बाजूने जाणारा टेम्पो रस्तादुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूला आला व त्याची मोटारीला ठोकर बसली. त्यात आनंद अभ्यंकर व अक्षय पेंडसे या अभिनेत्यांसह तिघे ठार, तर दोनजण जखमी झाले. द्रुतगती मार्गावर दोन्ही बाजूच्या लेनमधील दुभाजक हे बरेच रुंद असल्याने एक वाहन रस्ता ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये जाण्याची शक्यता कमी असते. तरीही या वर्षांत दर दहा दिवसाला एक या प्रमाणात तब्बल ३३ अपघात झाले आहेत. त्यात २१ जणांचे मृत्यू झाले आहेत.
याबाबत महामार्ग पोलिसांच्या पुणे विभागाचे अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी सांगितले की, अशा प्रकारे अपघात होण्याचे प्रमाण या वर्षी अचानक वाढले आहे. रविवारी रात्रीचा अपघात घडण्यापूर्वी खासदार भारतकुमार राऊत यांचा अपघातही अशाच प्रकारे झाला होता. आतापर्यंत क्वचितच घडणाऱ्या अशा अपघातांचे प्रमाण का वाढले, याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने महामार्ग पोलिसांकडून प्रयत्न केले जाणार आहेत. द्रुतगती मार्ग तयार झाल्यानंतर गेल्या १० वर्षांत त्याची रचना त्रासदायक ठरू लागली आहे का, या रस्त्यावर वाहनचालकांचा ताबा का सुटू लागला आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
द्रुतगती मार्ग मृत्यूचा सापळा?
पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला असून, या वर्षी या मार्गावर १०८ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या रस्त्यावर १ जानेवारी २०१२ पासून आतापर्यंत लहान-मोठे असे ४७५ अपघात झाले. त्यामध्ये ४३१ जण जखमी झाले आहेत.
हा रस्ता दोन विभागांमध्ये विभागला गेला आहे. त्यापैकी पुणे विभागात ११० अपघात घडले आहेत, तर ठाणे विभागात ही संख्या २६५ इतकी आहे. २०११ मध्ये एकटय़ा पुणे विभागातील द्रुतगती मार्गावर एकूण १२० अपघात झाले होते. त्यात ५२ जणांचा मृत्यू तर १८५ जण जखमी झाले होते.
उंच दुभाजकांचा उपाय?
द्रुतगती मार्गावर वाहने दुभाजक ओलांडून पलीकडे जात असतील तर त्यावर कोणते उपाय योजता येतील याबाबत चर्चा सुरू आहे. त्यानुसार दुभाजकाचे कठडे किमान अडीच फूट उंच बनवणे आणि मधल्या भागात माती भरणे हा एक उपाय गांभीर्याने चर्चिला जात आहे, असे अधीक्षक भुजबळ यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 25th Dec 2012 रोजी प्रकाशित
दुभाजक तोडून वर्षभरात ३३ अपघात; २१ ठार
महामार्ग पोलीस घेणार कारणांचा शोध पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटून ते वाहन रस्तादुभाजकाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन अपघात होण्याचे प्रमाण या वर्षी लक्षणीय वाढले आहे. या वर्षी अशा प्रकारचे एकूण ३३ अपघात घडले असून, त्यात २१ जणांना प्राण गमवावा लागला, तर ६० जण जखमी झाले आहेत. या वर्षी अशा अपघातांचे प्रमाण का वाढले आहे, याचा शोध घेण्यासाठी आता राज्य महामार्ग पोलीस पुढे सरसावले आहेत.
First published on: 25-12-2012 at 04:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Breaking of divider 33 accidents 21 dead this year