आंतरजातीय लग्नाला घरच्यांचा विरोध असतानाही विवाह करणाऱ्या तरुणीच्या पतीवर तिच्या भावानेच धारदार शस्त्रांनी वार केल्याची घटना येरवडा येथील आंबेडकर कॉलनी येथे शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास घडली. यामध्ये तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेडकर कॉलनी येथील एका तरुण- तरुणीचे प्रेमातून अडीच महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह केला होता. त्या विवाहाला तरुणीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. तरीही त्यांनी विवाह केल्यामुळे तरुणीच्या भावाला तिच्या नवऱ्याबद्दल राग होता. तरुणीच्या भावाने शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास तिच्या पतीवर धारदार शस्त्रांनी वार केले. यामध्ये तो तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.