जळगावमधील पाचोरा शहरात एक इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. इमारत कोसळतानाचा धक्कादायक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला असून शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे फक्त पाच वर्षांपूर्वी ही इमारत बांधण्यात आली होती. सुदैवाने इमारतीमधील रहिवाशांना वेळीच बाहेर काढण्यात आलं होतं, त्यामुळे कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.

पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागात सदर इमारत होती. सोमवारी रात्री ही इमारत कोसळली. पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारतीचं बांधकाम करताना त्यात तांत्रिक दोष राहिले होते असं सांगितलं जात आहे. मुंबईस्थित साजेदाबी शेख खलील यांनी पाचोरा शहरात गुंतवणूक म्हणून सदर तीन मजली इमारत पाच वर्षांपूर्वी बांधली होती. मात्र इमारतीला मोठ्या प्रमाणात तडे गेले होते. संभाव्य धोका लक्षात घेत भाडेकऱ्यांनी सदर इमारत अगोदरच रिकामी करुन घेतली होती. 20 सप्टेंबरच्या रात्री सुरु असलेल्या रिमझिम पावसामुळे ही इमारत अखेर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली.

यानंतर पाचोरा भडगाव तालुक्यातील आमदार किशोर पाटील यांनी घटनास्थळी जाऊन नागरिकांची भेट घेतली होती.