अक्कलकोटहून पोलादपूरकडे जाणाऱ्या बसला आंबेनळी घाटात अपघात झाला. ही बस घसरुन उलटली आणि दरीत कोसळली. या अपघातात २७ प्रवासी जखमी झाले आहेत. या बसमधून एकूण ४३ प्रवासी प्रवास करत होते. बुधवारी रात्री ८.३० ते ९ च्या सुमारास हा अपघात झाला. एम. एच. १४ बी.टी. ३५३६ असा या बसचा क्रमांक आहे. ही बस अक्कलकोटहून पोलादपूरकडे निघाली होती. त्याच दरम्यान आंबेनळी घाटात अपघात होऊन २७ जण जखमी झाले आहेत.

या अपघातातील जखमींना महाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही जखमींवर पोलादपूर या ठिकाणी उपचार सुरु आहेत. समोरुन येणाऱ्या वाहनाला साईड देत असताना ही बस २०० फूट दरी असलेल्या एका संरक्षण कठड्याला धडकली. त्यानंतर हा कठडा तुटून ही बस जवळपास ३० फूट खाली घसरली. मात्र ३० फुटांवर ही बस एका झाडामध्ये अडकल्याने मोठा अनर्थ टळला. बसमध्ये वाहनचालक, वाहक यांच्यासह ४३ प्रवासी होते. अपघात झाल्याचे समजताच पायटेवाडी येथील ग्रामस्थानी या ठिकाणी तातडीने धाव घेतली. जखमींना गाडीबाहेर काढले आणि रुग्णालयात पोहचवले. अपघाताचे वृत्त समजताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षाक जाधव हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी बचाव पथकाची मदत घेऊन बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले.