उद्योग क्षेत्रात लक्षणीय कामगिरी बजावणाऱ्या उद्योजकांना देण्यात येणाऱ्या मॅक्सेल पुरस्कारासाठी येथील प्रसिद्ध उद्योजक दीपक गद्रे यांची निवड झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते येत्या १२ मे रोजी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे या प्रसंगी मुख्य भाषण होणार आहे. राणा माशासारख्या एके काळी टाकाऊ मानल्या जाणाऱ्या माशावर प्रक्रिया करून रुचकर पदार्थ बनवण्याचे तंत्र गद्रे मरीन एक्स्पोर्ट कंपनीने विकसित केले. तसेच या पदार्थाच्या निर्यातीमध्येही आघाडी घेतली. त्यामुळे मच्छीमारांना जास्त चांगला दर मिळू लागला. जपानसारख्या या क्षेत्रातील अग्रणी देशाला माशांचे प्रक्रियायुक्त पदार्थ निर्यात करण्याची अभूतपूर्व कामगिरी गद्रे मरीन प्रॉडक्टस्ने बजावली. त्यामुळेच सागरी खाद्यान्न निर्यातीसाठी या कंपनीने उत्पादकता परिषदेची सात वेळा पारितोषिके पटकावली आहेत.