राज्य सरकारच्या वाळुविषयक धोरणामुळे वाळु टंचाई भासू लागल्याने सीमेंट पाइप लघु उद्योग बंद होणार असल्याची चिंता स्वन पाईप मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या राज्यव्यापी बैठकीत मालवण येथे व्यक्त करण्यात आली.
या संस्थेची राज्यव्यापी ४२वी वार्षिक सभा मालवण येथे रत्नागिरी सिंधुदुर्ग स्वन पाइप मॅन्युफॅक्चरच्या वतीने आयोजित केली होती. या सभेस राज्यभरातून ६० सिमेंट पाईप लघू उद्योजक उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गव्हाणे अध्यक्षस्थानी होते. यावेळी कमलाकांत परब, रत्नागिरी-सिंधुदुर्ग अध्यक्ष गिरीश शहा, यशवंत वळंजू आदी उपस्थित होते. यावेळी रमेश मुधाळे (सावंतवाडी), राजाभाऊ कानडे (चिपळूण), आबा शिंदे (पुणे), रणजीत खानविलकर (चिपळूण), राजेंद्र ढेरे (पुणे) यांचा मोलाचे योगदान दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
सीमेंट वाळू उत्पादनाची माहिती गव्हाण, रणजीत खानवीलकर यांनी क्लोज कॅनल सिस्टीम या विषयावर मार्गदर्शन करून पाण्याचा अपव्यय टाळून सिंचन क्षेत्रात क्रांती करता येईल त्याचे विवेचन केले.
राज्यामध्ये रोजगार निर्माण करणाऱ्या व शासनाच्या विविध योजनाना आवश्यक असणाऱ्या सिमेंट पाईप निर्मितीसाठी वाळूविषयक धोरणावर चिंता व्यक्त करून उत्पादन बंद पडण्याची भिती व्यक्त करण्यात आली. कोकण रिजन जॉइंट सेक्रेटरी अमित वळंजू यांनी आभार मानले.