शहरातील खासगी शिकवणीवर्गासमोर केंद्रीय उत्पादन, सीमा व सेवाशुल्क विभागाच्या पथकावर अंडे व दगडफेक केल्याप्रकरणी शिकवणीवर्ग चालकासह दहा जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, या प्रकारामुळे लातूरचे शैक्षणिक क्षेत्र ढवळून निघाले असून शिक्षणक्षेत्रात निर्माण झालेला अहंगंडाचा ‘पॅटर्न’ चिंतेचा विषय ठरला आहे. एकीकडे विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याचे आव्हान लीलया पेलणाऱ्या लातूर पॅटर्नपुढे आता नव्या घटनांचा अहंगंड टाळण्याचे आव्हान असल्याचे बोलले जात आहे.
साधारण २५ वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी लातूर, उदगीर, अहमदपूर परिसरात शाळा-महाविद्यालयांनी प्रयत्न सुरू केले. त्याचे चांगले परिणाम झाले. त्यातून लातूरचे नाव सर्वतोमुखी झाले. बालवाडीपासून ते बारावीपर्यंत लातूरमध्ये शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला. अकरावी, बारावी विज्ञान शाखेत प्रवेशासाठी राज्याबाहेरूनही विद्यार्थ्यांचा ओघ वाढला. दुसरीकडे शिक्षणक्षेत्रातील हे परिवर्तन अनुकूल मानून अनेकांनी दुकानदारी सुरू केली. बहुतांश महाविद्यालयांच्या भौतिक सुविधा मोठय़ा प्रमाणात वाढल्या. शाळा-महाविद्यालयांसह खासगी शिकवणीवर्गाचे मोठे जाळे निर्माण झाले. गेल्या काही वर्षांत स्थानिकांसह आंध्र प्रदेशातील व्यावसायिक मंडळीही पूर्ण ताकदीनिशी या क्षेत्रात उतरल्याचे चित्र आहे.
शहराच्या शिवाजीनगर भागात ४० वर्षांपूर्वी औद्योगिक वसाहत होती. या वसाहतीत आता औषधापुरताच एखाददुसरा उद्योग उरला आहे. खासगी शिकवणीवर्गाच्या टोलेजंग इमारती येथे उभ्या राहिल्या आहेत. सकाळी व सायंकाळी या परिसरात पायी फिरणेही दुरापास्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याची पालकांना चिंता असते, त्यामुळे पडेल ती किंमत पालक देतात. याचा नेमका लाभ उठवला जात आहे. खासगी शिकवणीवर्गात एकाच वेळी शेकडो विद्यार्थ्यांना शिकवले जाते. त्यामुळे पार्किंगपासून अनेक गरसोयी सहन कराव्या लागतात. या उद्योगात मोठय़ा प्रमाणात पसा मिळत असल्यामुळे स्पर्धाही वाढत राहिली व त्यातून हेवेदावे सुरू झाले. कोणत्याही उद्योगात कमीतकमी कर भरून अधिक नफा कमावण्याकडे कल असतो, तसा कल या वर्गात सुरू झाला. सेवा शुल्क विभागाने एका शिकवणीवर्गावर छापा टाकला. गावगुंडांना लाजवेल असा प्रकार गुरुवारी घडला.
राजर्षी शाहू महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नांदेड रस्त्यावरील िरगरोडवर नव्या इमारतीत विज्ञान विभागाचे कनिष्ठ महाविद्यालय सुरू केले. महाविद्यालयासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा रस्ता आहे. रस्त्यात दुभाजक आहे. एकेरी वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांची गरसोय टाळण्यासाठी महाविद्यालयासमोरील रस्ता दुभाजक तोडून टाकण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी ही सोय असली तरी बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र आपल्याला कोणतीही कल्पना न देता हे काम झाले असल्याचे व ते पुरते नियमबाहय़ असल्याचे सांगत आहेत. साहजिकच सेवाशुल्क पथकावर अंडी फेकण्याची घटना असो अथवा रस्त्यावरील दुभाजक तोडणे, हे दोन्ही एकाच मानसिकतेचे द्योतक आहेत, हा अहंगंड दूर करणे हीच चिंतेची बाब ठरत आहे.
‘सेवाशुल्क तपासणी हवीच’
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे ६५ शिकवणीवर्ग चालविले जातात. शहरात ही संख्या दोनशेच्या आसपास आहे. सेवाशुल्कसंबंधीची तपासणी आता सर्व खासगी शिकवणीवर्ग, तसेच काही शाळा-महाविद्यालयांत करण्याची गरज आहे. विनाअनुदानितच्या नावावर मोठे उद्योग उभे राहिले असून त्याचीही तपासणी होण्याची गरज आहे. जिल्हय़ाच्या शैक्षणिक क्षेत्रात दरवर्षी होणारी उलाढाल हजार कोटीच्या आसपास आहे, मात्र शिक्षणक्षेत्रात एकदा नाव झाले, म्हणजे काहीही करायला आम्ही रिकामे आहोत असा समज या मंडळींचा होत आहे.