शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची अधिकृत अधिसूचना राज्य शासनाने जारी केली असून ऑल इंडिया मेडिकल कौन्सिलकडे प्रस्तावाचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविद्यालय तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू करण्यात येणार आहे.
 गेल्या अनेक वर्षांंपासून वैद्यकीय महाविद्यालयाची प्रलंबित असलेली मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात मार्गी लावून वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली. गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत वैद्यकीय महाविद्यालयाची अधिसूचना जारी करण्यात आली. आता राज्य शासन ऑल इंडिया मेडिकल कौन्सिलकडे लवकरच महाविद्यालयाचा प्रस्ताव सादर करणार आहे. या महाविद्यालयाची क्षमता शंभर विद्यार्थ्यांची राहणार असून ८५ जागा राज्य सरकारच्या, तर १५ जागा केंद्र सरकारच्या प्रवेश प्रक्रियेव्दारे भरल्या जाणार आहेत. महाविद्यालयाच्या उभारणीसाठी जवळपास १३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असून पाच वर्षांत हा निधी टप्प्या टप्प्याने देण्यात येणार आहे, तसेच प्राध्यापकांच्या किमान ५०, तर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या १५० पदांना मान्यता मिळालेली आहे.
याच अधिसूचनेत सुरक्षा, आहार, वस्त्र, स्वच्छता या सुविधा निविदा काढून इतर खासगी संस्थांकडून पूर्ण केल्या जाणार आहेत. सर्वप्रथम महाविद्यालयाच्या बांधकामाला प्राधान्य देण्यात येणार असून तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा सामान्य रुग्णालयात महाविद्यालय सुरू केले जाणार आहे. पाचशे खाटांचे वैद्यकीय महाविद्यालय राहणार असून सध्या जिल्हा रुग्णालयातच ५०० खाटांची गरज पूर्ण केली जाणार आहे. सहा महिन्यापूर्वी शासकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. दीक्षित यांनी येथे भेट देऊन लोहारा येथील जागा निश्चत केली होती, मात्र कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी वनराजिक महाविद्यालय व दाताळा मार्गावरील म्हाडाची जागा सूचवली आहे. वनमंत्री पतंगराव कदम यांच्याकडे तशी मागणीही केली आहे. याबाबत अद्याप निर्णय झालेला नसला तरी जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी मूल मार्गावर लोहारा येथे व एमईएलजवळील मोकळी जागा, असे दोन पर्याय राज्य शासनाला पाठविले आहेत. यातील एका जागा निश्चित होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली, तर म्हाडा कॉलनीच्या जागेवर सिकलसेल स्पेशल हॉस्पिटल होणार आहे. या जिल्ह्य़ातील महिला रुग्णांसाठी क्षयरोग रुग्णालयात दोनशे खाटांचे स्वतंत्र महिला रुग्णालय होणार आहे.