नगर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाची उमेदवारी बदलण्याची आशा मावळत चालल्याने पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी आता थेट अस्त्र बाहेर काढले आहे. खासदार दिलीप गांधी यांची उमेदवारी बदला, अन्यथा त्यांना या निवडणुकीत पाडू असा थेट इशारा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांनीच शुक्रवारी जाहीररीत्या दिला. पक्षाने काय कारवाई करायची करावी असेही त्यांनी स्पष्ट केल्याने पक्षात खळबळ उडाली आहे.
ढाकणे येथे पाथर्डी येथे आज भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात ढाकणे बोलत होते. जिल्हा परिषदेच्या सभापती हर्षदा काकडे, सदस्य नितीन काकडे, माजी सदस्य मोहन पालवे, पंचायत समितीचे सदस्य विष्णू पवार, बेबीताई केळगंद्रे, पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, शेवगावचे तालुकाध्यक्ष तुषार पवार यांच्यासह शिवसेनेचे तालुकाप्रमुख  रफीक शेख, भारिपचे तालुकाध्यक्ष सुरेश भागवत आदी या मेळाव्याला उपस्थित होते.
ढाकणे यांनी गांधीवर थेट तोफ डागली. ते म्हणाले, गांधींनी आपले नेते गोपीनाथ मुंडे यांना डावलून लोकसभेची उमेदवारी मिळवली. मुंडे व कार्यकर्त्यांनीही आपल्याच उमेदवारीची शिफारस केली होती. या मतदारसंघात गेल्या वेळीच राजीव राजळे यांना भाजपची उमेदवारी निश्चित झाली होती. त्या वेळी आपणच प्रयत्न करून ती बदलण्यास भाग पाडून गांधी यांनाच उमेदवारी आणली. शिवाय तन-मन-धनाने काम करून त्यांना निवडूनही आणले. गांधी दोनदा खासदार झाले, आता त्यांनी थांबले पाहिजे. सज्जन माणसे सहसा चिडत नाही, मात्र चिडले तर काय करू शकतात हे आता दाखवून देऊ. पक्षाने गांधी यांची उमेदवारी बदलावी, अन्यथा आपल्याला डावलले तर जिल्ह्य़ात काय होऊ शकते हे दाखवून देऊ असे दंड थोपटून ढाकणे यांनी एक प्रकारे पक्षालाच आव्हान दिले.
मेळाव्यात सुरुवातीच्या सर्वच वक्त्यांनी गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे यांचा विजय सुकर व्हावा यासाठीच त्यांना उमेदवारी दिल्याचा आरोपही या वक्त्यांनी केला.