अशोक लांडे खूनप्रकरणात भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजी कर्डिले, काँग्रेसचे निलंबित शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर, त्यांची तीन मुले माजी महापौर संदीप, सचिन व अमोल यांच्यासह एकूण १५ आरोपींवर नाशिकचे जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. कदम यांच्यापुढे गुरुवारी दोषारोप निश्चित करण्यात आले. आता पुढील सुनावणी दि. ५ जुलैला ठेवण्यात आली आहे.
कोतकर यानेच गेल्या वर्षी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून खटला नगर जिल्हय़ाबाहेरील न्यायालयात चालवला जावा, अशी मागणी केली होती, त्यानुसार हा खटला नाशिकच्या जिल्हा न्यायालयात वर्ग करण्यात आला आहे. नगरच्या न्यायालयात कर्डिले, भानुदास कोतकर व त्यांची तीन मुले, अनिल पानसंबळ, विजय कराळे, सतीश कोतकर, सुनील भोडे, राजेश ढवळ, भाऊ ऊनवणे आदी १२ जणांविरुद्ध दोषारोप निश्चित करण्यात आले होते. आता नाशिकच्या न्यायालयात खटल्यात आणखी स्वप्नील पवार, वैभव अडसूळ व औदुंबर कोतकर या तिघांविरुद्ध दोषारोप निश्चित करण्यात आल्याने आरोपींची संख्या आता १५ झाली आहे.
आजच्या सुनावणीत नगरसेवक संदीप कोतकर याने महापालिकेच्या येत्या शनिवारी (दि. ५) सभेस सरकारी खर्चाने उपस्थित राहण्यास परवानगी मागितली होती, परंतु न्यायालयाने खर्च जमा करून पोलिस एस्कॉर्ट घेऊन जाण्यास सांगितले.
सन १९ मे २००८ रोजी मूळचा शेवगाव येथील लॉटरी विक्रेता असलेल्या अशोक भीमराज लांडे याचा केडगावमध्ये मारहाण करून खून करण्यात आला. पोलिसांनी खुनाच्या घटनेची दखल न घेतल्याने या घटनेचे साक्षीदार शंकरराव राऊत यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात सप्टेंबर २०११ मध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला व भानुदास कोतकरसह इतरांना अटक करण्यात आली. याचा तपास सुरुवातीला तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांनी केला होता.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jul 2014 रोजी प्रकाशित
नाशिकच्या न्यायालयात दोषारोप निश्चित
अशोक लांडे खूनप्रकरणात भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजी कर्डिले, काँग्रेसचे निलंबित शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर, त्यांची तीन मुले माजी महापौर संदीप, सचिन व अमोल यांच्यासह एकूण १५ आरोपींवर नाशिकचे जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. कदम यांच्यापुढे गुरुवारी दोषारोप निश्चित करण्यात आले.

First published on: 04-07-2014 at 04:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Charge decided in court of nashik in lande murder case