सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर अभियंत्याकडे १५ कोटींची सापडलेली मालमत्ता आश्चर्यकारक आहे. या पाश्र्वभूमीवर, या विभागातील सर्व अधिकारी आणि संबंधित मंत्र्यांच्या मालमत्तेची ‘सीआयडी’मार्फत चौकशी करावी तसेच या विभागाने केलेल्या कामांचा दर्जाही तपासण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
या बाबतचे निवेदन शनिवारी शिवसेनेचे नाशिक जिल्हाप्रमुख विजय करंजकर व गटनेते अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर याच्याकडे रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने मिळून सुमारे १५ कोटींची अवैध मालमत्ता आढळून आली आहे. ज्या शासकीय अधिकाऱ्याला २५ हजार रूपये वेतन आहे, त्याच्याकडे इतकी मालमत्ता पाहून खुद्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागही चक्रावून गेला. या घटनेने सार्वजनिक बांधकाम विभागातील अर्थपूर्ण व्यवहार उजेडात आले आहेत. एकटा चिखलीकर इतकी मालमत्ता जमवू शकत नाही. त्याला वरिष्ठ अधिकारी व राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य नाही. यामुळे या विभागातील अधिकारी व संबंधित मंत्र्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी, असे निवेदनात
म्हटले आहे. या विभागाकडे विकास कामांसाठी जो निधी येतो, त्यातील बरीचशी रक्कम या पद्धतीने गायब होते. परिणामी, जी कामे केली जातात, ती नित्कृष्ट दर्जाची असण्याचा संभव आहे.  त्यामुळे या विभागाने केलेल्या कामांचा दर्जाही तपासण्यात यावा, याकडे शिवसैनिकांनी लक्ष वेधले.