मनोज जरांगेंच्या मागण्या मारुतीच्या शेपटीसारख्या वाढत चालल्या आहेत. मुख्यमंत्र्यांना ते शिव्या देत आहेत. उपमुख्यमंत्र्यांना शिव्या देत आहेत. सगळ्या लोकांना मनोज जरांगे शिव्या देत आहेत. त्यांचं शिक्षण नाही, त्यांचा काही अभ्यास नाही तरीही ते बडबड करत आहेत. आता बघू काय होतं? असं म्हणत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले छगन भुजबळ?

जे लोक कायदा हातात घेतील त्यांच्याविरोधात कारवाई केली पाहिजे हे पोलिसांचं काम आहे. मनोज जरांगेंचे सहकारीच त्यांच्यावर आरोप करत आहेत. त्यामुळे आता त्या सगळ्याचीही चौकशी झाली पाहिजे म्हणजे नेमकं जरांगेच्या मागे कोण आहे ते लक्षात येईल असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. छगन भुजबळ यांनी रविवारी आक्रमक पवित्रा घेतला होता. आपण आता सागर बंगल्यावरच जातो आहोत असं त्यांनी म्हटलं होतं. तसंच ते सागर बंगल्याच्या दिशेने रवानाही झाले होते. आज अंबाडी या ठिकाणी संचारबंदी लागू केल्यानंतर ते माघारी परतले आहेत.

सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न हा आरोपच हास्यास्पद आहे याला मी काय उत्तर देणार असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. मला जरांगेवर प्रश्न विचारु नका. काही नाटकांचं स्क्रिप्ट लिहिण्याची सुरुवात झाली आहे. रायगडाला जेव्हा जाग येते ये नाटकाच्या धर्तीवर मी जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येतेचं स्क्रिप्ट लिहितो आहे. तर दुसरं नाटक सीमेवरुन परत जा. या दोन नाटकांची स्क्रिप्ट लिहितो आहे. असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला आहे.

मनोज जरांगे यांचं शांततेचं आवाहन

आपल्याला सगळ्या गोष्टी शांततेत करायच्या आहेत. आपण शांत राहून आंदोलन करु, ज्या गोष्टी हव्या आहेत त्या मिळवू. आत्ता मी एकटा पुरेसा आहे. कुणीही या ठिकाणी थांबू नका आपल्या आपल्या गाड्या घ्या आणि गावाला परत जा हे मी सांगतो आहे असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून इथून लवकर निघा. आपल्याला सगळ्या गोष्टी शांततेत करायच्या आहेत असंही जरांगे म्हणाले. तसंच त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.

हे पण वाचा- “मनोज जरांगेंचा बोलविता धनी कोण हे फडणवीसांना माहीत नसेल तर..”, संजय राऊत यांची टीका

मनोज जरांगे काय म्हणाले होते?

“माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय. यामागे देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मनात आले तर राज्यात काहीच होऊ शकत नाही. फडणवीसांचं न ऐकल्यावर काय होतं, ते तुम्हाला सांगतो. जो माणूस स्वत:चा पक्ष कधीच सोडू शकत नाही, अशा लोकांवर फडणवीसांमुळे भाजपा सोडण्याची वेळ आली. एकनाथ खडसे यांच्यावर फडणवीसांमुळे भाजपा सोडण्याची वेळ आली. विनोद तावडे महाराष्ट्रातून कधीच बाहेर जाणार नव्हते. मात्र त्यांना दिल्लीला जावे लागले. नाना पटोले यांनादेखील फडणवीसांमुळे भाजपा सोडून जावे लागले. पंकजा मुंडे आयुष्यातही भाजपा सोडण्याचा विचार करू शकत नाहीत. मात्र भाजपात त्यांची घुसमट होत आहे. फडणवीस हे महादेव जानकर यांना धनगरांचा नेता म्हणून मोठं होऊ देत नाहीयेत,” असे जरांगे म्हणाले होते. यानंतर आता मनोज जरांगेंच्या मागण्या मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढत आहेत अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal statement about manoj jarange patli said this thing scj
First published on: 26-02-2024 at 12:24 IST