scorecardresearch

पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणाबाजीवर मुख्यमंत्री शिंदेंची कडक शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले…

“चोराच्या उलट्या बोंबा कोणाच्या आहेत, हे लवकरच बाहेर येईल”, म्हणत ‘वेदान्त’वरून टीका करणाऱ्या विरोधकांना दिला इशारा

पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणाबाजीवर मुख्यमंत्री शिंदेंची कडक शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले…
(संग्रहीत छायाचित्र)

पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. या घटनेची दखल राज्य सरकार व गृहविभागाने गांभीर्याने घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “ज्यांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या त्यांना सोडणार नाही,” असं म्हणत गंभीर इशारा दिला आहे. तर, आता या गंभीर प्रकारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे.

पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘नारा ए तकबीर, ची घोषणाबाजी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील धक्कादायक Video

“छत्रपती शिवरायांच्या भूमीत पाकिस्तान जिंदाबादचे नारे खपवून घेतले जाणार नाहीत. ही छत्रपती शिवरायांची पावनभूमी आहे. इथे पाकिस्तान जिंदाबादचे नारे देण्याचा कोणालाही अधिकार नाही. हे देशभक्तांचे राज्य आहे. कोणालाही अशाप्रकारे घोषणाबाजी करण्याचा अधिकार नाही. सरकारने ही बाब अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे. यामध्ये गृहविभाग, पोलीस विभाग अतिशय गांभीर्याने या सगळ्या वृत्तीकडे पाहतोय. गृहविभाग त्यांचा कडेकोट बंदोबस्त करेल. या देशात देशद्रोही लोकांना कुठलही स्थान दिलं जाणार नाही. जे देशविरोधी, राज्यविरोधी कृत्य करत असतील त्यांचा योग्य समाचार गृहविभाग नक्कीच घेईल.” अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना इशारा दिला आहे.

पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणाबाजी, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करेलच, पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत.” असं मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्वीट देखील केलेलं आहे.

याशिवाय मुख्यमंत्री शिंदे यांनी वेदान्त प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राज्य सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांना देखील प्रत्युत्तर दिले. “वेदान्तबाबत मी या अगोदर माझी भूमिका मांडलेली आहे. त्याला जबाबदार कोण आहेत? चोराच्या उलट्या बोंबा कोणाच्या आहेत, हे लवकरच बाहेर येईल.” असं मुख्यमंत्री म्हणाले.

‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देत आंदोलन करणाऱ्या पीएफआयच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन करून घोषणाबाजी करणाऱ्या पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) कार्यकर्त्यांच्या विरोधात बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एनआयएने कोंढवा भागात केलेल्या कारवाईविरोधात पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या