पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन तिची छळवणूक करणाऱ्या पतीने रागाच्या भरात झोपेत असलेल्या आपल्या नऊ वर्षांच्या मुलावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात त्या चिमुरडय़ाचा जागीच मृत्यू झाला. तसेच त्याने पत्नी व इतर दोन मुलांवरही वार केले. या हल्ल्यातून ते तिघे बचावले. कल्याणच्या रामबाग गल्ली क्रमांक चारमधील स्वानंद कॉलनीत गुरुवारी पहाटे ही घटना घडली.
सुनील पाताडे ( ३६) असे या हल्लेखोर पतीचे नाव आहे. महात्मा फुले पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हल्ला केल्यानंतर सुनील पळून गेला होता. या हल्ल्यात नऊ वर्षांचा प्रणय जागीच ठार झाला. पत्नी मीना, पाच वर्षांचा सृजन, तीन वर्षांचा सर्वेश हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुनील हा वायरमन आहे. हल्ल्यासाठी त्याने केबल कटरचा वापर केला आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील धनवडे यांनी सांगितले, सुनील हा पत्नी मीनाच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. त्यांचा प्रेमविवाह झाला आहे. चारित्र्याच्या संशयावरून तो सतत तिच्याशी भांडण करून तिला मारहाण करीत असे.  
या छळवणुकीला मीना कंटाळली होती. काही लोकप्रतिनिधींनी सुनीलचे समुपदेशन करून त्याच्या मनातील संशय दूर करण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्याच्या मनात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्याचे भूत कायम होते.  
गुरुवारी पहाटे साडे तीन वाजता पत्नीसह तिन्ही मुले गाढ झोपेत असताना त्याने घरातील केबल कटर घेऊन चौघांवर वार केले. वर्मी घाव बसल्याने प्रणयचा जागीच मृत्यू झाला. पत्नी व इतर दोन मुलांवर त्याने वार केले. ते वेळीच सावध झाल्याने थोडक्यात बचावले.