चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळ बांधून तयार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कार्यक्रमाला बोलवणार का?, असा प्रश्न उपस्थित पत्रकारांनी विचारला असता ‘मुख्यमंत्री पाहिजेतच असं नाही’, असं उत्तर त्यांनी दिलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री उपस्थित राहणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला होता. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आता यावर उत्तर दिलं आहे.

माध्यमांशी संवाद साधत असताना देसाई यांनी या विमानतळाच्या उद्घाटनाविषयीची माहिती दिली. मुख्यमंत्री उद्घाटनाला उपस्थित राहणार की नाही याबद्दल बोलताना सुभाष देसाई म्हणाले, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे दोघेही उपस्थित राहणार आहेत. या प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक उद्योग विभाग असल्याने मीसुद्धा या दोन्ही प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करायला उपस्थित राहणार आहे.

हेही वाचा – चिपी विमानतळावरून श्रेयवाद!; नारायण राणेंनी केली उद्घाटनाच्या तारखेची घोषणा

नारायण राणे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का असं विचारलं असता देसाई म्हणाले, मला माहित नाही. त्यांना आमंत्रण द्यायचं आहे का याबद्दल माझ्याकडे तरी काही प्रस्ताव आलेला नाही.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कार्यक्रमाला बोलवणार का?, असा प्रश्न उपस्थित पत्रकारांनी विचारला असता ‘मुख्यमंत्री पाहिजेतच असं नाही’, असं उत्तर नारायण राणे यांनी दिलं होतं. “क्रेडीट घेण्याचं प्रश्नच नाही. मी २०१४ सालापर्यंत विमानतळ बांधून पूर्ण केलं. मी स्थानिक नाही का? आम्ही स्थानिक असल्याने आणि विमानतळ बांधल्याने आमचा अधिकार आहे. पर्यटन जिल्हा आम्ही जाहीर केला. कुणी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेना कोणत्या आधारावर बोलते हे माहिती नाही. मी संबंधित मंत्र्यांशी याबाबत बोललो आहे.”, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितलं होतं.