अलिबागच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन गेल्या महिन्याभरापासून बंद आहे. मशीनसाठी लागणारा इनव्हर्टर संचात बिघाड झाल्याने हे मशीन बंद आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना सिटीस्कॅन करण्यासाठी खासगी रुग्णालयात अथवा मुंबईतील सरकारी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते आहे.
   या मशीनसाठी आवश्यक असणाऱ्या इन्व्हर्टर संचात बिघाड झाल्याने हे मशीन बंद पडले आहे. त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्ह्य़ात सिटीस्कॅनची सुविधा असणारे हे एकमेव सरकारी रुग्णालय आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना सिटीस्कॅन करण्यासाठी खासगी रुग्णालयात अथवा मुंबईतील सरकारी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते आहे. जिल्हा रुग्णालयात अत्यंत किफायतशीर दरात उपलब्ध होत असलेल्या या सुविधेसाठी खासगी रुग्णालयात मोठी रक्कम मोजण्याची वेळ रुग्णांवर येते आहे. अन्यथा मुंबईतील सरकारी रुग्णालयात दोन ते तीन दिवस नंबर लावून सिटी स्कॅन करून घ्यावे लागते आहे.
  सिटीस्कॅन मशीन जवळपास महिनाभर बंद असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी मान्य केले आहे. या इन्व्हर्टर दुरुस्तीसाठी जवळपास पावणेदोन लाख रुपये खर्च येणार आहे. यासाठी आरोग्य संचालकांकडून मान्यता घेणे आवश्यक होते. आरोग्य संचालकांनी ही मान्यता दिली आहे. दुरुस्तीसाठी लागणारा निधी संबंधित कंपनीकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र मुंबई पुण्यातील नुकत्याच झालेल्या एलबीटी विरोधातील व्यापाऱ्यांच्या संपामुळे इन्व्हर्टरसाठी आवश्यक असणाऱ्या बॅटऱ्या आणि काही पार्ट्स वेळेवर उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे सिटीस्कॅन दुरुस्तीच्या कामाला उशीर झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पाटील यांनी सांगितले.
मशीनच्या बॅटऱ्या आणि पार्ट्स आता उपलब्ध झाले आहे. मशीन येत्या दोन ते तीन दिवसांत सुरू होईल, अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. मशीन सुरू  झाल्यावर कंपनी आधी चालवून बघेल, त्यांनतर ते रुग्णसेवेसाठी वापरले जाईल, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मात्र जिल्ह्य़ाच्या रुग्णसेवेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या या मशीनची तातडीने दुरुस्ती केली जावी, अशी मागणी केली जाते आहे.