जिल्हाधिकारी जाधव यांचा पुढाकार
निसर्गाचे वरदान लाभलेल्या रत्नागिरी जिल्ह्य़ात सार्वजनिक स्वच्छतेवर भर देत लोकसहभागातून व्यापक मोहीम हाती घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राजीव जाधव यांच्या पुढाकारातून नववर्षांपासून या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे.
जिल्हाधिकारीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून जाधव यांनी प्रशासकीय कामांबरोबरच रत्नागिरी शहर व जिल्ह्य़ात प्लास्टिक निर्मूलनासह सार्वजनिक स्वच्छतेचा सातत्याने आग्रह धरला आहे. त्या दृष्टीने त्यांनी रत्नागिरी शहरातील कचरा मोठय़ा स्वरूपात गोळा होणारी ठिकाणे तसेच पाणीसाठय़ाची पाहणी करून आवश्यक उपाययोजनांबाबत नगर परिषदेला यापूर्वीच सूचना दिल्या आहेत. पावसाळ्यानंतर ही मोहीम आणखी व्यापक करण्याचा मनोदय त्यांनी वेळोवेळी व्यक्त केला होता. त्यानुसार आता १ जानेवारी ते ३० एप्रिल २०१३ या चार महिन्यांत जिल्हाधिकाऱ्यांनी कालबद्ध सार्वजनिक स्वच्छता मोहीम जाहीर केली आहे.
शहरातील नागरिक आणि ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या आरोग्यरक्षणाबरोबरच प्रदूषण रोखणे व पर्यटकांना आकर्षित करण्याचेही हेतू या मोहिमेमागे आहेत. त्याबाबत पत्रकारांना माहिती देताना जाधव म्हणाले की, नगर परिषदा, ग्रामपंचायतींच्या हद्दीत सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य राखण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर आहे. पण त्यांच्या हद्दीबाहेरही मोठा भाग येतो. तेथे अनेक निसर्गरम्य स्थळे, ऐतिहासिक ठिकाणे, रमणीय सागरकिनारे आहेत. या सर्व परिसराची स्वच्छता राखणे हेही स्थानिक नागरिक आणि ग्रामस्थांचे कर्तव्य आहे. त्यांना तशी जाणीव करून देऊन शासकीय यंत्रणेबरोबरच लोकसहभागातून ही मोहीम राबवण्यात येणार आहे. तसेच त्यामध्ये सातत्य राखण्यासाठीही नियोजन केले जाणार आहे. निसर्गामुळे निर्माण होणारा किंवा विघटनकारी कचरा वगळता प्लास्टिक, काचा, बाटल्या, थर्मोकोल इत्यादी साहित्य गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यावर स्वच्छता मोहिमेत भर देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या अभिनव उपक्रमाबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्ह्य़ातील नऊ तालुक्यांमध्ये तालुकावार बैठका घेण्यात येणार असून स्वत: जिल्हाधिकारी जाधव त्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. संबंधित तालुक्यांमधील प्रतिष्ठित मंडळी, कार्यकर्ते आणि शासन यंत्रणेच्या समन्वयातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्य़ातील आणि जिल्ह्य़ाबाहेरील स्वयंसेवी संस्थांनीही यामध्ये सहभागी व्हावे; या संदर्भात जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे (९४०४६७०८८७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जाधव यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 21st Dec 2012 रोजी प्रकाशित
रत्नागिरी जिल्ह्य़ात लोकसहभागातून स्वच्छता मोहीम
निसर्गाचे वरदान लाभलेल्या रत्नागिरी जिल्ह्य़ात सार्वजनिक स्वच्छतेवर भर देत लोकसहभागातून व्यापक मोहीम हाती घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राजीव जाधव यांच्या पुढाकारातून नववर्षांपासून या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. जिल्हाधिकारीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून जाधव यांनी प्रशासकीय कामांबरोबरच रत्नागिरी शहर व जिल्ह्य़ात प्लास्टिक निर्मूलनासह सार्वजनिक स्वच्छतेचा सातत्याने आग्रह धरला आहे. त्या दृष्टीने त्यांनी रत्नागिरी शहरातील कचरा मोठय़ा स्वरूपात गोळा होणारी ठिकाणे तसेच पाणीसाठय़ाची पाहणी करून आवश्यक उपाययोजनांबाबत नगर परिषदेला यापूर्वीच सूचना दिल्या आहेत. पावसाळ्यानंतर ही
First published on: 21-12-2012 at 05:33 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cleanliness campagine in ratnagiri district with public involvement