देशात सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आहे. आता लवकरच दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची धावपळ सुरु आहे. तसेच प्रचारानेही वेग घेतला असून ठिकठिकाणी सभा, मेळावे सुरु आहेत. या अनुषंगाने आज अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

यावेळी सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंडिया आघाडीसह महाविकास आघाडी आणि राहुल गांधींवर हल्लाबोल केला. “राहुल गांधी यांनी पंतप्रधान होण्याचा विचार स्वप्नात जरी केला तरी ते होऊ शकत नाहीत, तो अधिकार फक्त नरेंद्र मोदी यांना आहे”, असा निशाणा मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्यावर साधला.

quiziframe id=30 dheight=282px mheight=417px

हेही वाचा : “विखे पाटलांची मुळं इतकी खोलवर आहेत, की मविआचं वरून कुणी आलं तरी…”, एकनाथ शिंदेंचा नगरमधून हल्लाबोल!

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीवर लोकांना विश्वास आहे. मात्र, बाकीच्या सर्व गॅरंटी फेल झाल्या आहेत. येथे फक्त एकच गॅरंटी चालती ती म्हणजे मोदी गॅरंटी. इंडिया आघाडीची काय अवस्था आहे. त्यांच्या इंजिनमध्ये माणसांना बसण्यासाठी डब्बे नाहीत. पण नरेंद्र मोदी यांच्या इंजिनला डब्बेच डब्बे आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नखाची सरही इंडिया आघाडीला येणार नाही”, अशी खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांवर केली.

पंतप्रधान होण्याचा अधिकार फक्त मोदींना

अहमदनगर येथील सभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “राहुल गांधींचे अजून लॉन्चिंग झाले नाही. मोदींनी तर इस्रोच्या माध्यमातून चंद्रावर चंद्रयानाचे यशस्वी लॉन्चिंग केले. पण राहुल गांधींचे गेल्या ५० वर्षात लॉन्चिंग होऊ शकले नाही. त्यामुळे ते कसे देश पुढे घेऊन जाणार? लोकांना मोदी पाहिजेत की राहुल गांधी असे विचारले तर लोक सांगतात मोदी पाहिजेत. त्यामुळे राहुल गांधींनी स्वप्नात जरी विचार केला तरी ते पंतप्रधान होऊ शकत नाहीत. पंतप्रधान होण्याचा अधिकार फक्त मोदी यांना आहे, कारण त्यांनी आपलं संपूर्ण जीवन देशाला समर्पित केलं आहे”, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.