बारामती लोकसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा विजय शिवतारे यांनी केली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर विजय शिवतारे यांनी बारामतीच्या निवडणुकीमधून माघार घेतली. यानंतर आज (११ एप्रिल) सासवडमध्ये महायुतीचा जनसंवाद मेळावा पार पडला. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विजय शिवतारे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक किस्सा सांगितला. विजय शिवतारे यांनी बारामतीची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“मी विजय शिवतारे यांचे मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. सर्व टिव्हीवर विजय शिवतारे दिसायचे. त्यानंतर मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा. आपण महायुती म्हणून निवडणूक लढवतोय. महायुतीमध्ये आपल्याला एक एक मतदारसंघ जिंकायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. ही विकासाची लढाई आहे. या देशाला महासत्तेकडे घेऊन जाण्यासाठी नरेंद्र मोदी यांना आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे.

त्यामुळे मी विजय शिवतारे यांना सांगितले की, बापू आपण महायुतीत आहोत. मी मुख्यमंत्री आहे, माझे तुम्ही कार्यकर्ते, पदाधिकारी आहात. या निवडणुकीमध्ये आपल्याला महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना निवडून द्यायचे आहे. तुमच्यामुळे या महायुतीला तढा जाईल आणि महायुतीचे नुकसान होईल, असे कुठलेही काम आपल्या हातातून होता कामा नये”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा : विजय शिवतारे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना शब्द; म्हणाले, “बारामतीच्या विजयामध्ये पुरंदरचा सिंहाचा वाटा असेल”

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, “विजय शिवतारे चांगलेच जिद्दीला पेटले होते. माझ्याकडे काही लोकही आले होते. त्यांना निवडणुकीला उभे राहूद्या म्हणून सांगत होते. यानंतर विजय शिवतारे यांनीही सांगितले की, मी बारामती लोकसभा मतदारसंघामधून का निवडणूक लढवली पाहिजे. ते म्हणाले, या मतदारसंघाचे कामे झाले पाहिजेत. यानंतर यासंदर्भातील एक पत्रक त्यांनी आम्हाला दिले.”

“यानंतर ते म्हणाले माझ्याबाबत लोकांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, कारण विजय शिवतारे यांनी एकदा निर्णय घेतला आणि नंतर तो निर्णय मागे घेतला तर आरोप-प्रत्यारोप होतील. त्यामुळे तुम्ही येऊन जनतेसमोर संवाद साधा, असे वियज शिवतारे यांनी मला सांगितले, त्यामुळे आज येथे आलो आहे. विजय शिवतारे यांनी सांगितले की, मी निवडणूक लढण्याचा आग्रह केला, जनतेसाठी भांडलो, मी टिव्हीवर मुलाखती दिल्या. पण मी दुस्मनी करतो तर मनापासून आणि मैत्री करतो तर मनापासून असे शिवतारे यांनी मला सांगितले. त्यामुळे मलादेखील असाच माणूस आवडतो”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.