शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली. यानंतर आज (११ एप्रिल) सासवडमध्ये महायुतीचा जनसंवाद मेळावा पार पडला. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती. या मेळाव्यात बोलताना विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शब्द देत बारामतीच्या विजयामध्ये पुरंदरचा सिंहाचा वाटा असेल, असे म्हटले आहे.

विजय शिवतारे काय म्हणाले?

“महायुतीला आपल्या येथे (पुरंदर) बहुमत मिळाले पाहिजे. काही गोष्टी घडत असतात. पण या गोष्टी विसरुन जायच्या असतात. मतभेद झाले हरकत नाही. पण मनभेद नको. त्यामुळे पुरंदरची तीनही पक्षांची सर्व स्वाभिमानी मंडळी या ठिकाणी आली आहेत. मी सर्वांना विनंती करतो की, ८० ते ९० टक्के मतदान सुनेत्रा पवार यांना झाले पाहिजे, म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झाले पाहिजे. आज या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले आहेत. मी तुमचे (मुख्यमंत्री शिंदे यांचे) ऐकले. त्यामुळे पुढे माझी काय काळजी घ्यायची ते तुम्ही घ्या. पण तुमच्या शब्दाचा मान ठेवला आहे.

हेही वाचा : बारामतीच्या निवडणुकीतून माघार का घेतली? विजय शिवतारे म्हणाले, “…तर उर्जा कशाला वाया घालवायची”

आता बारामतीच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा बारामती नाही तर पुरंदरचा असेल. बारामतीमध्ये समसमान मतदान होईल किंवा कमी जास्त होईल. पण पुरंदरमध्ये ही स्वाभिमानी जनता तुम्हाला बारामतीत जसे आधी लीड मिळायचे, तशा लीडसाठी आम्ही फिरु. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी अशा सर्व कार्यकर्त्यांचे मनोमिलन असल्यामुळे काही अडचण नाही. आम्ही सर्वजण संपूर्ण ताकदीने प्रयत्न करु”, असे विजय शिवतारे या सभेत बोलताना म्हणाले.

दरम्यान, विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघामधून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर विजय शिवतारे यांनी बारामतीच्या निवडणुकीमधून माघार घेतली. यानंतर आज सासवडमध्ये महायुतीच्या जनसंवाद मेळाव्यात विजय शिवतारे यांनी बारामतीच्या विजयामध्ये पुरंदरचा सिंहाचा वाटा असेल, असे सांगितले.