दापोली : “सन आयलाय गो, आयलाय गो, नारली पुनवेचा! मनी आनंद मावना कोळ्यांच्या दुनियेचा” या गाण्यांच्या तालावर हर्णे बंदरात नारळी पौर्णिमे निमित्त जल्लोषाचा माहोल रंगला. रत्नागिरी जिल्ह्यातील दोन नंबरचे बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हर्णे, पाजपंढरी येथे पारंपरिक पधतीने कोळी बांधवांनी, विविध संघटनांच्या सहभागातून पारंपारिक मिरवणुका, सजवलेल्या होड्या आणि सोन्याचा नारळ अर्पण करण्याचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.

सजवलेल्या होड्या आणि मिरवणुकीचा जल्लोष

दोन महिन्यांच्या मासेमारी बंदीनंतर कोळीवाड्यांमध्ये नवचैतन्य आणणाऱ्या या सणासाठी हर्णे व पाजपंढरी येथील मिरवणुकीत होड्यांना देखण्या सजावटीने सजवण्यात आले. त्यातील मुख्य आकर्षण म्हणजे मोठा सोनेरी रंगाने मढवलेला नारळ, जो दर्यादेवतेस अर्पण करण्यात आला. रिक्षा संघटना, व्यापारी मित्र मंडळ, संपूर्ण कोळीवाडा संघटना, फत्तेगड ग्रामस्थ मंडळ यांसह अनेक संघटनांनी दणक्यात मिरवणुका काढल्या. पारंपरिक वाद्यांचा गजर, ढोल-ताशांच्या तालावर थिरकणारे पाय, आणि डीजेच्या आवाजाने बंदर परिसर दणाणून गेला.

मान्यवरांची उपस्थिती आणि पोलीस बंदोबस्त

पारंपरिक वेशभूषा आणि सोन्याच्या दागिन्यांनी सजलेल्या कोळी महिला, तसेच आबालवृद्धांसह लहान मुलांचा उत्स्फूर्त सहभाग यावेळी पाहायला मिळाला. कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम, हर्णे ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य, दापोली तहसीलदार, प्रांताधिकारी, शासकीय अधिकारी, तसेच दापोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश तोरस्कर व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम चोख पोलीस बंदोबस्तात शांततेत पार पडला.

दर्यादेवतेस सोन्याचा नारळ अर्पण

समुद्रकिनारी विधिवत पूजा करून सोन्याचा नारळ दर्यादेवतेस अर्पण करताना कोळी बांधवांच्या चेहऱ्यावर अपार उत्साह दिसत होता. गर्दीने फुललेल्या हर्णे जेटीवर “आमच्या बांधवांचे रक्षण कर” अशी साद दर्यादेवतेस घालण्यात आली. आगामी मासेमारी हंगाम समृद्ध होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करण्यात आली.

इतिहास आणि परंपरा

पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने मासेमारीला बंदी असते. पूर्वी नारळी पौर्णिमेनंतरच मासेमारी हंगामाला सुरुवात व्हायची, मात्र गेल्या काही वर्षांत १ ऑगस्टपासूनच मासेमारी सुरू होते. तरीदेखील हा सण कोळी समाजासाठी धार्मिक, सांस्कृतिक आणि भावनिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. पावसाळ्यानंतर खोल समुद्रात मासेमारी सुरू करण्याआधी दर्यादेवतेस नारळ अर्पण करण्याची परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने पाळली जाते.

उत्साहाचा केंद्रबिंदू

दुपारनंतर भरजरी कपडे किंवा पारंपरिक पोशाख परिधान करून कोळी बांधव व भगिनी समुद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले. वाजतगाजत निघालेल्या मिरवणुका, सजवलेल्या होड्या आणि आनंदी वातावरण पाहण्यासाठी दूरदूरून आलेल्या पर्यटकांनीही हर्णे बंदर गजबजून गेले. अखेरीस सोन्याचा नारळ अर्पण करून कोळी बांधव पुन्हा एकदा आपल्या होऱ्या वल्हवत “दर्या”च्या लाटांशी स्पर्धा करण्यासाठी सज्ज झाले.