दिवाळी संपल्यानंतर वातावरणाचा ताबा उत्तरेकडील वाऱ्यांनी घेतल्यामुळे महाराष्ट्रभर थंडीचे साम्राज्य पसरले असून, सर्वच ठिकाणी रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा ३ ते ७ अंशांनी खाली उतरले आहे. पुण्यासह नगर, सातारा, जळगाव, नाशिक, परभणी, यवतमाळ येथे पारा १० अंशांच्या खाली आला. नगर येथे ७.८ अंश सेल्सिअस या रविवारच्या नीचांकी तापमानाची नोंद झाली.
मंगळवारी थंडी आणखी तीव्र होण्याचा अंदाज वेधशाळेतर्फे वर्तविण्यात आला आहे. राज्यात रविवारी सकाळी नोंदवले गेलेले किमान तापमान पुढीलप्रमाणे (अंश सेल्सिअसमध्ये)- पुणे ९, सातारा १०, सांगली १२.६, कोल्हापूर १४.४, सोलापूर १२.१, नगर ७.८, नाशिक ८.१, मालेगाव ११.१, जळगाव ९.८, औरंगाबाद १२.९, परभणी ९.६, मुंबई (कुलाबा) २१.३, सांताक्रुझ १५.२, रत्नागिरी १५.५, अलिबाग १७, अकोला ११.७, नागपूर १०.५, यवतमाळ ८.८, वर्धा ११.५, अमरावती १३.८
मराठवाडय़ाप्रमाणे मध्य महाराष्ट्रातही थंडीची लाट आहे. राज्यात अवतरलेली ही थंडीची लाट उत्तरेकडील थंड व कोरडय़ा वाऱ्यांचा परिणाम आहे. मंगळवारी तापमानात आणखी एक-दीड अंशांची घट होईल, असे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले.