आग लागल्याचा दूरध्वनी येऊनही कर्मचाऱ्यांची पाठ; बेजबाबदार कर्मचाऱ्याविरोधात अहवाल सादर
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्यात लागलेल्या आगीकडे अग्निशमन दलाच्या एका कर्मचाऱ्यांने दुर्लक्ष केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कारखान्यात आग लागली असल्याचा दूरध्वनी आला असतानादेखील कर्मचाऱ्याने दुर्लक्ष केल्याने आगीचे प्रमाण वाढले असल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या बेजबाबदार वागणाऱ्या कर्मचाऱ्याविरोधात कारवाईबाबतचा अहवाल सादर करण्यात आला आहे.
औद्योगिक क्षेत्रातील रेजोन्स पेशिलिटी लि. प्लॉट नंबर टी- १४० या कारखान्यात २३ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ६ च्या दरम्यान आग लागली होती. आग लागताच कारखान्यातील एका कर्मचाऱ्याने लागलीच ६:१४ वाजता तारापुर औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन केंद्रावर दूरध्वनी केला होता. समोरून दूरध्वनी उचलणाऱ्या अग्निशमन कर्मचाऱ्यांला आगी बाबत संपूर्ण माहिती कारखान्याकडून दिली असतानादेखील त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत कारखान्याकडून दोन वेळा तारापूर अग्निशमन दलाला पत्र पाठवूनदेखील अधिकाऱ्यांनी याबाबत कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले नसल्याचे दिसून आले आहे. आगीचे लोण वाढत असतानादेखील अग्निशमन दलाचा बंब त्याठिकाणी पोचल्या नसल्याने कारखान्यातील उपकरणानेच आगीवर नियंत्रण आणावे लागले होते.
कारखान्यात आग लागल्यानंतर अग्निशमन केंद्रात आलेला दूरध्वनी याबाबत पुरावा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून याबाबत चौकशी सुरू असल्याने फुटेज दाखवता येणार नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे झालेल्या प्रकाराला एकप्रकारे अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला असला तरी अशा प्रकारामुळे मोठी हानी होण्याची शक्यता असल्याने बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कर्मचाऱ्यांनी आग लागल्याची वर्दी देणारा दूरध्वनी येऊनदेखील दुर्लक्ष केल्याचा प्रकार घडला असल्याने याबाबत संपूर्ण चौकशी करून कारवाईबाबत अहवाल वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. वरिष्ठांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. – मनीष सावंत, अग्निशमन केंद्र अधिकारी, तारापूर