येत्या २५ – २६ फेब्रुवारीला नागपुरात होणाऱ्या औद्योगिक गुंतवणूकदारांच्या परिषदेवरचे अनिश्चिततेच सावट मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बुधवारी दीर्घ बैठक घेऊन दूर केल्यानंतर ‘अॅडव्हांटेज विदर्भ’ला विरोध करणाऱ्यांचा आवाज हळूहळू बुलंद होऊ लागला आहे. विदर्भाच्या विकास प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व संवैधानिक दर्जा असलेल्या विदर्भ वैधानिक मंडळाचे अस्तित्व शासनलेखी खिजगणतीतही नसल्याचे दाखवून देण्यात आल्याने नाराजीची पहिली ठिणगी पडली आहे. आयोजनाचे साधे पत्रही मंडळाला आले नसल्याचा गौप्यस्फोट ज्येष्ठ सदस्य मधुकरराव किंमतकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केल्यानंतर शासकीय यंत्रणा आज हलली.
औद्योगिक संस्था आणि शासकीय यंत्रणेचे आयोजन असल्याने सर्वाना सहभागी करून घेतले जाणार असल्याचे दावे केले जात असताना मंडळाच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष केल्याने अॅड. किंमतकर यांनी संताप व्यक्त केला आहे. विदर्भातील काही मंत्र्यांनाही बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीचे निमंत्रण नव्हते. त्यामुळे ‘अॅडव्हांटेज’साठी आटापिटा करत असलेले नागपूरचे पालकमंत्री मोघे आणि ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्यावरच साऱ्या सूचनांचा भडिमार झाला. निमंत्रण नव्हते त्यांनी मुख्यमंत्र्यां -पर्यंत नाराजी पोहोचवली आहे.
केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल आणि राज्याचे उद्योग मंत्री नारायण राणे यांचा भक्कम पाठिंबा असल्याशिवाय अॅडव्हांटेजच्या आयोजनाला वेग येण्याची चिन्हे नाहीत. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी ‘अॅडव्हांटेज’च्या आयोजनात सक्रिय सहभागाची आणि पूर्ण पाठिंब्याची हमी दिली असताना त्यांच्या गटातील एक विश्वासू व नागपूर महापालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जोशी यांनी आयोजनावर जबरदस्त टीकास्त्र सोडल्याने भाजपच्या एकूणच भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. काँग्रेसने आगामी विधानसभा आणि निवडणुकांच्या तोंडावर अॅडव्हांटेजचे आयोजन करून राजकीय फायदा लाटण्यासाठी प्रयत्न चालविल्याचे संदीप जोशी यांनी म्हटले आहे. गेल्या दहा वर्षांत नागपूरच्या विकासाकडे दुर्लक्ष करणाऱ्या काँग्रेसला आताच उद्योजकांच्या परिषदेची आठवण का यावी, असा सवाल करून त्यांनी गडकरींच्या भूमिकेला छेद दिला आहे.
अॅकेडमी ऑफ न्यूट्रिशन इम्प्रुव्हमेंटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शांतीलाल कोठारी यांनीही आयोजनाला विरोध दर्शविणारे पत्रक जारी केले आहे. विदर्भात भीषण दुष्काळ, कुपोषण, बेरोजगारी असताना कर्ज घेऊन होणारे आयोजन प्रत्यक्षात विदर्भातील जनतेच्या फायद्याचे नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. स्वयंरोजगाराची कोणतीही हमी यातून दिली  विकास होणार असल्याचा टेंभा मिरवणाऱ्यांवर त्यांनी सडकून टीका केली असून नव्या पिढीला गुलामगिरीत लोटणाऱ्या आयोजनापेक्षापेक्षा स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण केल्यास त्याचा फायदा मिळेल, असे म्हटले आहे.