प्रबोध देशपांडे

अकोला : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली. काँग्रेस आणि वंचितची लोकसभा निवडणुकीतील आघाडी होणार का, यावरून अंदाज बांधले जात असतानाच अ‍ॅड. आंबेडकरांनी अकोल्यातून स्वत:ची उमेदवारी जाहीर केली. आता आघाडी झाली तरी अकोल्याची जागा अ‍ॅड.आंबेडकरांसाठी काँग्रेसला सोडावी लागेल. आघाडीच्या चर्चेपूर्वीच वंचितने पुढचे पाऊल टाकल्याने काँग्रेसची कोंडी झाली.

Congress candidate Praniti Shinde criticizes BJP in Solapur
सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी काढली भाजपची लाज
Mohite-Patil, Mohite-Patil family revolt,
मोहिते-पाटील कुटुंबीयांचे २१ वर्षांनंतर पुन्हा बंड !
Former Congress president Rahul Gandhi filed his candidature from Wayanad in Kerala
वायनाडमध्ये शक्तिप्रदर्शनासह राहुल गांधी यांचा अर्ज; अमेठीमधून उमेदवारीबाबत मौन
lok sabha elections 2024 vanchit bahujan aghadi chief prakash ambedkar exit from alliance with maha vikas aghadi
नागपूर, कोल्हापूरसाठी काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या प्रकाश आंबेडकरांविरोधातच अकोल्यात उमेदवार

काँग्रेस व वंचितची आघाडी होण्यावरून साशंकता व्यक्त होत असून अकोल्यात पुन्हा एकदा तिरंगी लढतीचे संकेत मिळत आहेत. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेते जोमाने कामाला लागले. निवडणुकीसाठी जुळवाजुळव व तळागाळातून मोर्चेबांधणी केली जात आहे. लोकसभा निवडणूक लढण्याच्या घोषणेमध्ये वंचितने त्यात आघाडी घेतली. परंपरागत अकोला लोकसभा मतदारसंघातून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर स्वत: निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. १९८४ पासून अ‍ॅड. आंबेडकर सातत्याने अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढत आहेत. आता २०२४ मध्ये सलग अकराव्यांदा ते येथून आपले नशीब आजमावणार आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघावर १९८४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसने आपले वर्चस्व राखले. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने नेते स्व.भाऊसाहेब फुंडकर यांनी काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावला. त्यानंतरच्या लोकसभा निवडणुका लढून देखील काँग्रेसचा सातत्याने पराभवच झाला. १९९८ आणि १९९९ च्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजय मिळवला आहे.

२००४ पासून सलग चार लोकसभा निवडणुका खासदार संजय धोत्रे यांनी जिंकून अकोला मतदारसंघ भाजपचा अभेद्य गड निर्माण केला. भाजप, काँग्रेस व वंचित आघाडीमध्ये झालेल्या तिरंगी लढतीत, भाजपला थेट लाभ झाल्याचा अकोल्याचा इतिहास आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर व काँग्रेस एकत्र आल्याशिवाय भाजपचा पराभव होऊ शकत नसल्याचे लोकसभेच्या गेल्या नऊ निवडणुकांच्या निकालावरून समोर येते. गेल्या दोन दशकातील लोकसभा निवडणुकांमध्ये अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर व काँग्रेसमध्ये आघाडीच्या चर्चेचे गुऱ्हाळ चालते. प्रत्यक्षात १९९९ नंतर अ‍ॅड.आंबेडकर आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाली नाही. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून केवळ प्रसारमाध्यमांमधूनच चर्चा रंगते. तडजोडीअभावी गेल्या चार लोकसभा निवडणुकांमध्ये ते स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरले.

पाडापाडीच्या राजकारणाचा आरोप

दोन्ही बाजूने पाडापाडीचे राजकारण देखील केले जात असल्याचा आरोप आहे. तिरंगी लढतीचे समीकरण आतापर्यंत भाजपच्या पथ्थ्यावर पडले. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अ‍ॅड. आंबेडकर व काँग्रेसच्या आघाडीची चर्चा सुरू झाली. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल यांनी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून आघाडीसंदर्भात बोलणी केली. दिल्ली येथील वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाल्याची देखील चर्चा आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी आघाडीच्या निर्णयाची वाट न पाहता वंचित आघाडी लोकसभा निवडणूक लढण्यासह स्वत:च्या उमेदवारीची घोषणा केली. त्यामुळे आता आघाडी झाल्यास अ‍ॅड. आंबेडकरांसाठी काँग्रेसला अकोल्याची जागा सोडावी लागेलच. काँग्रेसचा सातत्याने पराभव होत असलेल्या इतरही काही जागांवर अ‍ॅड. आंबेडकरांचा दावा राहील. या घोषणेच्या माध्यमातून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसपुढे टाकलेल्या गुगलीचा सामना आता ते कशा पद्धतीने करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

काँग्रेसमध्ये मतमतांतरे 

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांसोबत आघाडी करण्यावरून काँग्रेसमध्ये जिल्ह्यापासून ते राज्यस्तरापर्यंत नेत्यांमध्ये मतमतांतरे आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांमुळे काँग्रेसला अनेक ठिकाणी मोठा फटका बसला. तो धोका यावेळेस टाळण्यासाठी काही वरिष्ठ नेते युतीसाठी आग्रही आहेत, तर काही वरिष्ठांचा विरोध देखील असल्याची खात्रीलायक माहिती आहे. लोकसभेच्या अकोला जिल्हा आढावा बैठकीत बहुतांश नेत्यांनी काँग्रेसनेच ही जागा लढवण्याची मागणी केली, तर काहींनी वंचितबरोबर आघाडी करण्याचे मत  नोंदवले आहे.

आघाडी करण्यासंदर्भात काँग्रेसने आपली भूमिका जाहीर करावी. लोकसभा निवडणुकीत आघाडी करण्यासाठी आमच्याकडून चर्चेची दारे उघडी आहेत. – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी.