नरेंद्र मोदींमुळे केंद्रात भाजपची सत्ता येणार आहे. जास्तीत-जास्त खासदार निवडून येऊन मोदीच पंतप्रधान होतील, असे सांगतानाच मोदी पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा काँग्रेसचे अनेक नेतेही आमच्याजवळ व्यक्त करीत आहेत, असा दावा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार शहानवाज हुसेन यांनी केला.
शरद पवार यांची घडी सध्या ‘पंजा’ मध्ये अडकली आहे. अजूनही पवार मनाने काँग्रेससोबत नसल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसवर विश्वास ठेवल्यामुळेच मुस्लीम समाजाची अधोगती झाल्याचे सांगून पवार या बाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
बीडमधील भाजप उमेदवार गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारासाठी हुसेन मंगळवारी आले होते. पत्रकार बठकीत ते म्हणाले की, गुजरातमध्ये अल्पसंख्याक समाज गुण्यागोिवदाने राहात आहे. काँग्रेसकडून मात्र गुजरात दंगलीचे राजकारण केले जात आहे. महाराष्ट्रातील भिवंडी दंगलीसंदर्भात न बोलता गुजरातच्या दंगलीच्या नावावरून मुस्लीम समाजात भीती निर्माण करण्याचे काम काँग्रेसकडून केले जात आहे. भाजपची ज्या-ज्या ठिकाणी सत्ता आहे, तेथे सर्वत्र न्याय व समतेला प्राधान्य दिले जाते. मोदी यांच्यामुळे भाजपला नुकसान नव्हे, तर मोठा फायदा होणार असून त्यांच्यामुळे जास्त खासदार निवडून येतील, असा दावा हुसेन यांनी केला.
काँग्रेस-राष्ट्रवादीनेच महाराष्ट्रात जाती-पातीचे राजकारण केले. नितीन गडकरी व गोपीनाथ मुंडे हे कमळाचे दोन शिपाई असल्याचा उल्लेख करीत गडकरी यांच्या प्रचारासाठी विदर्भात गेलो होतो, असे हुसेन यांनी सांगितले. भाजपचेच काही नेते मुंडेंचा पराभव पाहण्यास उत्सुक आहेत, या पवारांच्या विधानावर हुसेन म्हणाले, देशात सर्वत्र मोदींची हवा आहे. अनेक काँग्रेसच्या नेत्यांनाही मोदीच पंतप्रधान व्हावेत, असे वाटत आहे. ते आमच्याजवळ तसे बोलूनही दाखवत असल्याचे हुसेन यांनी सांगितले. हुसेन यांनी बीड, नेकनूर येथे जाहीर सभा घेऊन मुंडेंना विजयी करण्याचे आवाहन केले.