मतदानाची टक्केवारी अवघी ३६.५७ असतानाही यवतमाळ विधानसभेच्या रविवारी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या नंदिनी पारवेकर यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार मदन येरावार यांचा १५ हजार २२३ मतांनी पराभव केला. नंदिनी पारवेकर यांना ६२ हजार ५०९ तर मदन येरावार यांना ४२ हजार २७६ मते मिळाली. या मतदारसंघाचे काँग्रेस आमदार नीलेश पारवेकर यांच्या अपघाती निधनामुळे ही पोटनिवडणूक घ्यावी लागली.
कमी मतदान होऊनही काँग्रेसच्या नंदिनी पारवेकरांनी नीलेश पारवेकर यांच्यापेक्षा साडेसहा हजार मते जास्त घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. २००९ च्या निवडणुकीतच नीलेश पारवेकरांना ५६ हजार १८७ मते मिळाली होती, तर यंदाच्या पोटनिवडणुकीत नंदिनी पारवेकरांना ६२ हजार ५०९ मते मिळाली. इलेक्ट्रॉनिक मशीनने मतदान झाल्यामुळे एकही मत अवैध ठरले नाही.
काँग्रेसच्या नंदिनी पारवेकरांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाइंच्या कवाडे, गवई गटाचा तर भाजप उमेदवाराला शिवसेना आणि रिपाइंच्या आठवले गटाचा पाठिंबा होता. मागच्या निवडणुकीत अपक्ष लढलेल्या राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत गाडे पाटील यांची यावेळी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने हकालपट्टी करण्यापूर्वी गाडे पाटील भाजपमध्ये गेले. त्यांना २००९च्या निवडणुकीत १८ हजार ६२२ मते मिळवली होती. परंतु, मतदारांनी गाडे पाटलांच्या भागात काँग्रेसलाच मतदान केले.