आधीच दुष्काळ आणि शासनाचे दुर्लक्ष पाहता संयुक्त महाराष्ट्रात सामील होऊन चूक केली काय, असे मराठवाडय़ातील जनतेला वाटू लागले असल्याचे उद्विग्न उद्गार बीडचे आमदार अमरसिंह पंडित यांनी काढले. मराठवाडय़ातील भीषण दुष्काळ पाहता विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ करावे तसेच शेतीचे कर्ज माफ न करता पुनर्घटित करावे, अशी मागणी त्यांनी केली. दुष्काळासारख्या गंभीर विषयावर चर्चा सुरू असताना कॅबिनेट मंत्रीच उपस्थित नसल्याने विधान परिषदेचे कामकाज बुधवारी नऊ  वेळा तहकूब करावे लागले.
दुष्काळावरील चर्चेत विरोधी बाकावरील सदस्यांसह सत्तारुढ बाकावरील अनेक आमदारांनी तळमळीने त्यांच्या भावना व्यक्त केल्या. एसआयटी चौकशीसाठी विरोधी बाकावरील सदस्य घोषणा द्यायचे तेव्हा त्यांना घोषणांनी प्रत्युत्तर देण्यात आघाडीवर राहणारे बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित यांनी मराठवाडय़ातील दुष्काळावर प्रकाश टाकीत शासनाच्या नाकर्तेपणाविरुद्ध तेवढय़ाच पोटतिडकीने संतप्त भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, सुमारे सव्वालाख मजूर मराठवाडय़ातून स्थलांतरित झाले आहेत. त्यांना थांबवणे सोडाच त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. किंबहुना त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्या गेल्याची शंका येते. ४०-४० किलोमीटर अंतरावरून पिण्यासाठी पाणी आणावे लागते. दुष्काळास तोंड देण्यासाठी नियोजनच झालेले नाही. पाणी नाही. कामेही करता येत नाही. पाझरविहिरी करता येत नाहीत. जनतेला आत्महतेशिवाय पर्याय राहिलेला नाही. छावण्यांना परवानगी दिली जात नाही. छावण्या उघडतोच म्हटले तरी त्याच्या जाचक अटी आहेत. संयुक्त महाराष्ट्रात सामील होऊन चूक केली काय, असे जनतेला वाटू लागले आहे, असे उद्विग्न उद्गार त्यांनी काढले. एवढा भीषण दुष्काळ पाहता शासनाचे दुर्लक्ष पाहून त्यांनी ‘हे हिवाळी अधिवेशन त्यांच्यासाठी दिवाळी आहे’ या शब्दात अमरसिंह पंडित यांनी तीव्र संताप व्यक्त केला. मराठवाडय़ात शिक्षण शुल्क माफ करावे. शेतीचे कर्ज माफ करू नका, ते पुनर्घटित करा, अशी मागणी त्यांनी केली.