करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाउन करण्यात आलेला असताना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एका गावाजवळ रस्त्यावर उंच प्रवेशद्वार उभारण्यात येत आहे. दरम्यान, या बांधकामाच्यावेळी प्रवेशद्वाराची उंच कमान कोसळून त्यात तीन मजूर मृत्युमुखी पडल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेमुळे लॉकडाउनच्या अंमलबजावणीचा फोलपणा समोर आला आहे.

बार्शी-तुळजापूर रस्त्यावर वैरागजवळ बावी या गावाच्या वेशीवर प्रवेशद्वार उभारण्याचे काम सुरू आहे. गेल्या २३ मार्चपासून देशभरात लॉकडाउन पुकारण्यात आला असताना त्यानुसार प्रवेशद्वार उभारण्याचे काम बंद होणे अपेक्षित होते. परंतू तरीही कायदा धाब्यावर बसवून हे बांधकाम सुरूच होते. मात्र, रविवारी दुपारी काम सुरू असतानाच प्रवेशद्वाराची उंच कमान अचानकपणे कोसळली. यात वाळू, सिमेंटसह लोखंडी सळयांचा सांगाडा (काँक्रिट) अंगावर पडल्याने तीन मजुरांचा मृत्यू झाला.

लॉकडाउन लागू असताना रस्त्यावर प्रवेशद्वार उभारण्याचे काम कसे चालू होते? महसूल व पोलीस प्रशासनाच्या नजरेत हे बांधकाम कसे आले नाही? तीन मजुरांना प्राण गमवावे लागलेल्या या दुर्घटनेस नेमके कोण जबाबदार आहेत? असे प्रश्न यामुळे उपस्थित झाले आहेत. अर्थात, या दुर्घटनेनंतर बार्शी पोलीस व महसूल प्रशासन घटनास्थळी धावून जाण्याचा सोपस्कार झाला असून संबंधितांवर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रियाही हाती घेण्यात आली आहे.