आपला लढा आकडेवारीशी नाही, तर करोनाविरोधात आहे. त्यावर लक्ष केंद्रीत करा अशी विनंती माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. रूग्ण बरे होत आहेत हे दाखवण्याचा घाईत मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढत आहे अशी टीकादेखील यावेळी त्यांनी केली आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी २४ तासात ८ हजार ३८१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. ही संख्या गेल्या अनेक दिवसांमधली विक्रमी संख्या आहे अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरला लोकसत्ताची बातमी शेअर करत ही टीका केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “काल एकाच दिवशी ८३८१ रूग्ण घरी सोडण्यात आल्याचा दावा आणि मृत्यूसंख्या आजवरची सर्वाधिक ११६. रूग्ण बरे होत आहेत हे दाखवण्याचा घाईत मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. आपला लढा आकडेवारीशी नाही, तर करोनाविरोधात आहे. त्यावर लक्ष केंद्रीत करा अशी विनंती”.

राजेश टोपे यांनी काय माहिती दिली होती –
राजेश टोपे यांनी शुक्रवारी २४ तासात ८ हजार ३८१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती दिली होती. तसंच सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ३३ हजार १२४ अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर २६ हजार ९९७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या ३३ हजारांमध्येही एक जमेची बाजू ही आहे की ८३ रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं नाहीत. उर्वरीत जे १५-१६ टक्के जे रुग्ण आहेत त्यांना मध्यम प्रकारात मोडणारी लक्षणं दिसत आहेत. व्हेंटिलेटर अवघ्या दीड टक्के लोकांना लागतो आहे असं सांगितलं होतं. आजची संख्या मी जाणीवपूर्वक अधोरेखित जोडतो आहे. सध्याचा आपला रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ४३ टक्के इतकं आहे. तर मृत्यूदर हा ३.३ टक्के आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं होतं.

आणखी वाचा- “रूग्ण बरे होत आहेत हे दाखवण्याचा घाईत मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढतंय”, देवेंद्र फडणवीसांची टीका

फडणवीसांनी शेअर केलेली बातमी कोणती ?
वांद्रे पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले हवालदार दीपक हाटे यांचा शुक्रवारी करोनाने मृत्यू झाला. दहा दिवस शासकीय केंद्रात उपचार घेतल्यानंतर हाटे यांना घरी सोडण्यात आले होते. घरी परतल्यानंतर चार तासांतच त्यांचा मृत्यू झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुंबई पोलीस दलातील मृतांची संख्या १६ झाली आहे.

हाटे वरळी पोलीस वसाहतीत वास्तव्यास होते. १८ मे ला त्यांची प्रकृती खालावली. करोनाबाधित असल्याचे स्पष्ट होताच त्यांना वरळीच्या वल्लभभाई स्टेडियम येथील केंद्रात दाखल केले गेले. दहा दिवस उपचार घेतल्यानंतर गुरुवारी रात्री त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. हाटे यांच्याबाबतची एक ध्वनिचित्रफीत शुक्रवारी समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. या चित्रफितीत हाटे अशक्त असल्याचे स्पष्टपणे दिसते, अशी माहिती एका पोलिसाने दिली.