राज्यावर करोनाचं संकट असताना राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ३ ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना यासंबंधी माहिती दिली आहे. “परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर २२ तारखेला अधिवेशन घेणं शक्य नाही असं लक्षात आलं आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर ३ ऑगस्टला अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पुरवण्या मागण्यांसाठी एक दिवसाचं अधिवेशन घेण्याची शक्यता आहे,” अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

करोनाची साथ सुरू झाल्याने आठवडाभर आधीच राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळण्यात आलं होतं. करोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पावसाळी अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट होतं. हे अधिवेशन ठरल्याप्रमाणे घ्यायचे की पुढे ढकलायचे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठकही पार पडली होती.

आणखी वाचा- ३० जून नंतरही लॉकडाउन कायम राहणार का? उद्धव ठाकरे म्हणतात…

याआधी पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून सुरू होईल असं जाहीर करण्यात आलं होतं. पण ३० जूनपर्यंत सर्व रेल्वे आरक्षण रद्द झाल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून आमदार व त्यांचे कर्मचारी मुंबईत कसे येणार, करोनाच्या काळात ही गर्दी करायची का असे प्रश्नही समोर होते. त्यामुळे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याबाबत विचार सुरू होते. दरम्यान ३ ऑगस्टपासून राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मात्र हे अधिवेशन फक्त चार दिवस चालणार असल्याचं सांगितलं जात आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन लवकरात लवकर संपवलं जाणार असल्याची माहिती आहे.

आणखी वाचा- “मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणी मारामारी करायला कोणी येत नाही”, उद्धव ठाकरेंनी फेटाळलं ‘ते’ वृत्त

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २० मार्चपर्यंत चालणार होतं. पण करोनाच्या साथीला तोंड देण्यासाठी विधिमंडळाच्या कामकाजातून प्रशासनाला मुक्त करण्यासाठी १४ मार्चला अधिवेशन गुंडाळण्यात आलं होतं. पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून सुरू होईल, असं जाहीर झालं होतं. मात्र, राज्यात करोनाची साथ कायम असल्याने सर्व यंत्रणा करोनानियंत्रण व इतर अनुषंगिक गोष्टींमध्ये गुंतल्या आहेत. त्यामुळे अधिवेशन नेमकं कधी होणार असा प्रश्न निर्माण झाला होता.