महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात माजी महापौर, उपमहापौरांसह अनेक आजी-माजी नगरसेवकांना धक्के बसले असून नव्या प्रभाग रचनेबरोबर आरक्षणाचा फटका बसल्याने एक तर त्यांना प्रभाग बदलणे किंवा आपापल्या सौभाग्यवतींना रिंगणात उतरविणे भाग पडणार आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका सभागृहात ही सोडत काढण्यात आली. नवीन रचनेनुसार ३७ प्रभागांसाठी एकूण ७५ जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यात ३० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी चार तर या प्रवर्गात महिलांसाठी तीन जागा आरक्षित आहेत. अनुसूचित जमातीसाठी जार जागा राखीव असून त्यात महिलांसाठी दोन जागा राखीव आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी २० जागा आरक्षित असून त्यात महिलांसाठी दहा जागांचे आरक्षण आहे. ४६ जागा सर्वसाधारण असून त्यात २३ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंडोरे यांचा प्रभाग पाच अ महिलांसाठी (अनुसूचित जमाती) आरक्षित झाल्याने त्यांना स्वत: निवडणूक लढता येणार नाही. विद्यमान महापौर किशोर पाटील यांचा प्रभाग मात्र या आरक्षणातून बचावला आहे.