नगर : शिवसेनेच्या आंदोलनानंतर महापालिकेचे तत्कालीन उद्यान विभागप्रमुख तसेच विद्यमान प्रभाग अधिकारी मेहेर लहारे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मनपाच्या कै. बाळासाहेब देशपांडे उद्यानातील १३ सौर पथदिवे गायब झाल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. मेहेर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने केली होती. आंदोलनावेळी शिवसेना पदाधिकारी व उपायुक्त यशवंत डांगे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली.  सिद्धीबागेजवळील बाळासाहेब देशपांडे उद्यानातून १३ सौर पथदिवे गायब झाले. त्यावेळचे उद्यान विभाग प्रमुख मेहरे यांच्या सूचनेनुसार हे पथदिवे हलवण्यात आल्याचा जबाब मनपा कर्मचाऱ्यांनी दिला होता. त्यामुळे मेहर यांच्यावर कारवाई करण्याची करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला होता. मेहेर सध्या प्रभात समिती क्रमांक तीनचे प्रभाग अधिकारी आहेत.

त्यानुसार शिवसेनेचे पदाधिकारी विक्रम राठोड, अभिषेक कळमकर, दिलीप सातपुते, गिरीश जाधव, बाळासाहेब बोराटे, अनिल शिंदे, योगीराज गाडे, सचिन जाधव, अशोक बडे, अमोल येवले, सचिन जाधव, स्मिता अष्टेकर आदींनी जोरदार घोषणा देत आयुक्तांच्या दालनात ठिय्या दिला. उपायुक्त डांगे यांनी चौकशी करून निलंबन करण्याचे आश्वासन दिले. मात्र निलंबनाशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा इशारा शिवसेनेने दिला. अखेर बऱ्याच वादावादीनंतर उपायुक्त डांगे यांनी आयुक्त शंकर गोरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानंतर उपायुक्त श्रीनिवास कुरे यांच्या आदेशाने मेहेर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.