पनवेलचा लाचखोर तहसीलदार नरहरी सानप याला अलिबागच्या सत्र न्यायालयाने सात वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली . याशिवाय सानप याला १ लाख ५० हजार रुपयाचा दंडही ठोठावला . हा दंड न भरल्यास १ वर्ष आणि ९ महिन्यांची अतिरीक्त सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. एखाद्या वर्ग १ च्या अधिकाऱ्याला लाचखोरीच्या प्रकरणात येवढी मोठी शिक्षा होण्याची ही पहीली घटना ठरली आहे.
पनवेलमध्ये  तहसिलदार म्हणुन कार्यरत असतांना नरहरी सानप यांनी विचुंबे गावातील एका जमिनीचा हक्क सोडण्यासाठी शशिकला पै यांच्या कडे १ लाखाची लाच मागीतली होती. मात्र तडजोडीनंतर ७० हजार रुपये देण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यापैकी ५० हजार रुपये २६ जुलै २००६ देण्याचे पै यांनी मान्य केले होते. याबाबतची तक्रार त्यांनी ठाण्याच्या लाच लुचपत विभागाकडे नोंदवली होती. यानंतर पोलीस उप अधिक्षक डी एस दातार यांनी सापळा रचुन नरहरी सानप यांना ५० हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर या गुन्ह्य़ाचा तपास पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील यांच्या कडे सोपवण्यात आला. त्यांनी सानप यांच्या पनवेल येथील निवासस्थानावर धाड टाकली या धाडीत त्यांच्या घरी तब्बल १३ लाख ५० हजारांची रक्कम आणि १८ विदेशी दारुच्या बाटल्या आढळुन आल्या होत्या. त्यांनतर त्यांच्या नगर जिल्ह्य़ातील बख्तरपुर येथील घरावर धाडी टाकण्यात आल्या. त्यांच्या घरी ५३ लाख ४३ हजार रुपयांची रोकड आणि १८ लाखांचे दागिने आढळुन आले. या शिवाय त्यांच्या कार्यालयात १ लाख २३ हजार तर अंगझडतीत २९ हजार रुपये मिळुन आले होते. यानंतर त्यांच्यावर बेकायदेशीर अपसंपदा आणि बेकायदेशीर दारु बाळगल्या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते.