scorecardresearch

बीड जिल्ह्यात गुटखा प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंसह चौघांवर गुन्हा!

राजकीय वर्तुळात खळबळ ; पोलिसांनी एकाला अटक केली आहे

crime-13
(प्रातिनिधिक फोटो)

राज्यात बंदी असतानाही गुटख्याची सर्रास विक्री आणि साठा होत आहे. नांदूरघाट (ता.केज) येथील दुकानात छापा टाकून पोलिसांनी दीड लाखाचा गुटखा जप्त केल्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, बीडच्या गोदामातून गुटखा आणल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी स्वतः बीड जवळील इमामपूर  रस्त्यावरील गोदामावर कारवाई केली. दोन्ही कारवाईत ३२ लाख २४ हजार २२९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, असुन याप्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह चौघांविरुध्द गुन्हे दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बीड जिल्ह्यातील केज पोलीस ठाण्यात बुधवार दि. १७ नोव्हेंबर रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह महारुद्र उर्फ आबा मुळे, शेख वसीम शेख सिराज (सर्व रा.बीड) आणि चंद्रकांत उर्फ गोट्या रामेश्‍वर कानडे (रा.नांदूरघाट ता. केज) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांनी मंगळवारी नांदूरघाट (ता.केज) येथील रामहरी जाधव यांच्या दुकानावर छापा टाकून १ लाख ५७ हजार २६५ रुपयांचा गुटखा जप्त केला. पोलिसांनी जाधव यास ताब्यात घेऊन गुटख्याविषयी चौकशी केली असता, बीड येथील इमामपूर रस्त्यावरील गोदामातून गुटखा आणल्याचे समोर आले. सदर कारवाईनंतर कुमावत यांनी सहकार्‍यांसह मंगळवारी रात्री उशिरा बीडजवळील इमामपूर रस्त्यावरील गोदामावर छापा टाकला. त्याठिकाणी विक्रीसाठी बंदी असलेल्या विविध प्रकारच्या गुटख्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी गुटख्यासह सुगंधित तंबाखू, टेम्पो आणि भ्रमणध्वनी असा एकूण ३२ लाख २४ हजार २२९ रुपयांचा माल ताब्यात घेतला. राज्यात गुटखा बंदी असतानाही त्याचा साठा करुन विक्री व वाहतूक करणे. सुगंधित सुपारी, तंबाखू मिश्रीत गुटखा अपायकारक असतानाही स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता विक्रीसाठी ताब्यात बाळगल्याप्रकरणी पोलिस हवालदार बालाजी दराडे यांनी तक्रार दिली. त्या अनुषंगाने शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिसांनी एकाला अटक केली आहे. 

सत्ताधारी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांवरील कारवाईने खळबळ –

बीड येथील शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्याविरुध्द गुटख्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. महिनाभरापूर्वीच शिवसेनेतीलच एका गटाने पक्ष नेत्यांसमोर खांडेंच्या कारभाराच्या तक्रारी केल्या होत्या. अवैध धंद्यांमध्ये खांडेंचा सहभाग असल्याचा आरोपही केला होता. यापूर्वी गुटख्यासह अन्य प्रकरणामध्ये त्यांचे नाव आल्याने त्यांच्याविरुध्द कारवाई करा, अशी मागणीही पक्षातीलच काही पदाधिकार्‍यांनी श्रेष्ठींकडे केली होती. आता गुटख्याच्या प्रकरणात थेट सत्ताधारी पक्षाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंचे नाव आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-11-2021 at 19:38 IST

संबंधित बातम्या