दलितांचे तिहेरी हत्याकांड, दलित महिलेवर गुंड टोळीकडून अत्याचार आणि वेगवेगळ्या चार ठिकाणी अल्पवयीन मुलींवर अत्याचार.. या लागोपाठच्या घटनांनी नगर जिल्हयाची प्रतिमा काळवंडली आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या महिनाभरातील चार घटनांपैकी दोन घटना शिर्डीतच घडल्या हे आणखी विशेष. जिल्ह्य़ाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहेच, मात्र कायदा व सुव्यवस्थेचाही पुरता बोजवारा वाजल्याचीच ही चिन्हे आहेत. तिहेरी हत्याकांडाचा तपास विलंबानेच सीआयडीकडे गेला, मात्र महिलेवरील अत्याचाराच्या तपासात अजूनही ढिलाईच सुरू आहे. यातील पाच आरोपी अद्यापि फरार आहेत. याशिवाय अन्य छोटय़ा-मोठय़ा गुन्हेगारी घटनांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच आता आक्षेप घेण्यात येऊ लागले आहेत.
नववर्षदिनीच दि. १ जानेवारीला नेवासे तालुक्यातील सोनई परिसरात अमानुष हत्याकांड झाले. दलित समाजातील संदीप राजू धनवार, सचिन सोनलाल थारू व राहुल कंडारे तिघा तरूण सफाई कामगारांची निर्घृण हत्या करण्यात आली. शरीराचे बारीक, बारीक तुकडे करून बोअरमध्ये, विहिरीत व परिसरात अन्यत्र विखरून पसरवण्यात आले होते. प्रेमप्रकरणावरून झालेल्या हत्येबाबत मुळातच पहिल्यापासून कमालीची गुप्तता पाळण्यात आली. अजूनही कोणी त्याची वाच्यता करत नाही.  
अगदी सुरूवातीला प्रकाश विश्वनाथ दरंदले व रमेश विश्वनाथ दरंदले या दोघा भावंडांना या प्रकरणी अटक करण्यात आली. नंतर त्यांचा तिसरा भाऊ पोपट विश्वनाथ दरंदले याच्यासह संदीप कुऱ्हे व अशोक नवगिरे यांना अटक करण्यात आली. यातील थारू याचे आरोपींच्या घरातील एका मुलीवर प्रेम होते व ते दोघे लग्न करणार होते. ते टाळण्यासाठीच हे अमानुष हत्याकांड करण्यात आले. हत्याकांडासाठी आरोपींनी वापरलेली शस्त्रेही पोलिसांनी जप्त केली आहेत. याच दरम्यान शिर्डी येथून एका नऊ वर्षांच्या बालिकेचे अपहरण झाले, दहा दिवसांनी छिन्न विच्छिन्न अवस्थेत तिचा मृतदेह येथील रेल्वेस्थानकाजवळील काटवनात सापडला. मूळचा नाशिक येथील असलेल्या सुनील साळवी या नराधमाने या बालिकेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. एवढय़ावरच तो थांबला नाही, कार्यभाग उरकल्यानंतर ब्लेडने गळा चिरून त्याने या निष्पाप जीवाची हत्या केली. अशा स्वरूपाचे या आरोपीचे हे चौथे कृत्य आहे. याआधीही त्याने तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या केली. त्यातील दोन गुन्ह्य़ांमध्ये शिक्षा भोगून आल्यानंतर त्याने पुन्हा शिर्डीत हे कृत्य केले. पोलिसांनी सापळा रचून मनमाडमध्ये या आरोपीला अटक केली. श्रीरामपूर येथे किरकोळ भांडणाच्या कारणावरून दलित महिलेचे घरात घुसून अपहरण करण्यात आले, तिची अमानुष विटंबना गुंडाच्या टोळीने केली. काँग्रेसच्या नगरसेवकाशी संबंधित या टोळीतील दहा जणांना पोलिसांनी अटक केली खरी, मात्र विविध संघटनांच्या दबावानंतरच पोलिसांना या प्रकरणात जाग आली. या गुन्ह्य़ातील पाच आरापींना अजूनही अटक झालेली नाही, या घटनेशी संबंध असणाऱ्या रेल्वेतील फेरीवाल्यांकडून खंडणी गोळा करणाऱ्यावर गुन्हा दाखल करून काहींना पोलिसांनी अटक केली, मात्र आठ, दहा दिवसातच हा गोरख धंदा पुन्हा सुरू झाल्याचे सांगण्यात येते. याचाच अर्थ गुन्हेगारी मोडून काढण्याची पोलिसांची मानसिकता राहिलेली नाही. नगरच्या जिल्हा सरकारी रूग्णालयातही याप्रकरणी हलगर्जीपणा झाल्याचेच दिसते.      
शिर्डीहूनच दि. ४ फेब्रुवारीला जीपचालकाने दोघा बहिणींना पळवून नेले. यातील अल्पवयीन मुलीवर जीपचालक सुभाष गंगाधर गायकवाड याने मोठय़ा बहिणीदेखत जीपमध्येच बलात्कार केला. पारनेर तालुक्यातील वडझिरे येथील शाळकरी मुलीला राजू पांडुरंग मोरे याने लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेले. पंधरा दिवसांपासून या अपहरणाचा तपासच सुरू आहे.
या सततच्या घटनांनी जिल्हा हादरून गेला आहे. याशिवाय चोऱ्या, दरोडे, हाणामाऱ्या हे प्रकार सुरूच आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांचा वचक राहिला नाही हेच याचे मुख्य कारण आहे. या सर्व गुन्ह्य़ांचा कमी-अधिक काळाने तपास लागला, काहींचा सुरू आहे. मात्र गुन्हेगारी मोडून काढण्यात पोलिसांना साफ अपयश आल्याचेच दिसते. सातत्याने घडणाऱ्या घटना त्याचेच द्योतक मानले आहे. पोलिसांच्या या ढिलाईला राजकीय दबाव हे एक कारण असल्याचेही बोलले जाते. काही प्रमाणात त्यात तथ्यही असून त्यामुळेच हा चिंतेचा विषय बनला आहे.
अतिरिक्त अधीक्षक निलंबीत
उत्तर प्रदेशातील मुलीचे पुणे-शिर्डी प्रवासात नगर शहरातून अपहरण झाले. ही घटनाही याच काळातील आहे. या मुलीला वाममार्गाला लावण्याचा प्रयत्न झाल्याचीही तिची तक्रार असून नगरच्या पोलिसांच्या यातील संशयास्पद कार्यवाहीची गंभीर दखल घेत अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय बारकुंड व एका निरीक्षकासह दोन अधिकारी अलिकडेच निलंबित झाले आहेत. एखाद्या प्रकरणात एवढा वरिष्ठ अधिकारी निलंबित होण्याची ही जिल्ह्य़ातील पहिलीच घटना आहे.